Amravati Bus Firing : अमरावती-नागपूर महामार्गावर खासगी बसवर गोळीबार, चारजण जखमी
Firing | Representational image (Photo Credits: pixabay)

Amravati Bus Firing : राज्यातील महामार्गावरुन रात्रीच्यावेळी प्रवास सुरक्षित आहे का? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. कारण, एका धावत्या ट्रॅव्हल बसवर रात्रीच्यावेळी सिनेस्टाईल गोळीबार (Amravati Bus Firing) झाला आहे.  त्यामुळे महामार्गावरुन प्रवासाच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर (Amravati-Nagpur highway) तिवसा जवळच नागपूरच्या दिशेने जात असताना रात्री उशिरा ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र, या गोळीबारात चार जण जखमी (four injured) झाले आहेत. हा गोळीबार का करण्यात आला? हे अद्याप समजलेले नाही. काहींच्या मते हा दहशत पसरवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. पाठीमागून आलेल्या बोलेरोमधील काहींनी खासगी बसच्या ड्रायव्हरच्या दिशेने धडाधड गोळ्या झाडल्या. सध्या या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. (हेही वाचा:Ulhasnagar Firing Case: भाजप आमदार गणपत गायकवाडांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी)

पहाटेपर्यंत पोलिसांनी या भागात नाकाबंदी लावली होती. गोळीबारात जखमी झालेल्या प्रवाशांना तिवसा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी तिवसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग 6 वरुन दररोज हजारो वाहने जात असतात. मात्र, आता या घटनेमुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भिती निर्माण झाली आहे. कारण गोळीबार व्यक्तीगत कारणातून झाला की, लुटमारीच्या उद्देशाने ते अजून स्पष्ट झालेलं नाही. (हेही वाचा:Satara Firing Case: साताऱ्यातील पाटण येथे गोळीबार, दोन ठार, एक गंभीर जखमी; ठाणे येथील माजी नगरसेवक मदन कदम पोलिसांच्या ताब्यात)

सध्या राज्यात अनेक गोळीबाराच्या घटना घडत आहेत. पुण्यात काही दिवसांपूर्वी गुंडाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तसेच, कल्याण पूर्व भागात भाजप आमदाराकडून शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यात नगरसेवकाचा मृत्यू झाला.