
अमरावती (Amravati) जिल्ह्यातील मोर्शी (Morshi) येथे रुग्णवाहिकेच्या अभावी एका महिलेने भररस्त्यात बाळाला जन्म दिल्याची एक धक्कादायक घटना समोर येत आहे. यांनतर संबंधित महिलेला एका रिक्षातुन रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथवर पोहचेपर्यंत वाटेतच तिचा मृत्यू झाला . आशा परशुराम बारस्कर असे या महिलेचे नाव असून त्या 35वर्षाच्या होत्या. आशा यांना प्रसूती वेदना सुरु होताच वरूड आणि मोर्शी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले जात होते मात्र यावेळी रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध भररस्त्यात त्यांची प्रसूती करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, अमरावती रुग्णलयात जाण्यासाठी आशा आणि त्यांचे पती हे दोघे एसटी बसने निघाले होते पण रस्त्यातच त्यांच्या प्रसूती वेदना वाढल्याने एसटी वाहकाने त्यांना मोर्शी येथील जयस्तंभ चौकात उतरण्यास सांगितले. याबाबत माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य कमर अली लियाकत अली यांनी तातडीने रुग्णालयातील दायी कमलाबाई यांना घटनास्थळी आणले. यापुढे त्यांना हॉस्पिटल मध्ये नेणे शक्य नसल्याने भररस्त्यात एक छोटासा आडोसा तयार करून आशा यांची प्रसूती करण्यात आली. पण यानंतरही त्यांना रुग्णलयात नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने त्यांना एका मालवाहू रिक्षातून मोर्शी रुग्णलायत नेण्यात आले.
साहजिकच या सर्व प्रकारामुळे त्यांची प्रकृती नाजूक झाली होती म्ह्णून डॉक्टरांनी त्यांना अमरावती रुग्णलयात दाखल करण्याचा सल्ला दिला मात्र तिथवर पोहचण्याआधीच त्यांचच वाटेत मृत्यू झाला. (देशभरात राष्ट्रीय महामार्गावर 450 रुग्णवाहिका तैनात असणार- नितीन गडकरी)
दरम्यान, यानंतर महिलेच्या नातेवाइकांकडून रुग्णालय व डॉक्टरांच्या कामकाजावर संतप्त सवाल केले जात आहेत. ढिसाळ यंत्रणेमुळेआशा हिचा बळी गेल्याचा आरोप त्यांनी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.