Gold & Sliver Rate | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये वाढती कोरोना रूग्णसंख्या पाहता त्याचा फटका आता पुन्हा अर्थव्यवस्था आणि आर्थिक घडामोडींवर दिसण्यास सुरूवात झाल्याचं चित्र आहे. आज सकाळी मुंबई शेअर बाजारत पडझड होत पुन्हा सोन्याचे भाव चढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर (Gold Rate) पुन्हा चढले आहेत. एमसीएक्सवर सोन्याचा जूनचा वायदा 116 रूपयांनी वाढून 47469 प्रति तोळे असा वर पोहचला आहे. दरम्यान ही वाढ 0.24% आहे. मागील वर्षी कोरोना वायरसच्या पहिल्या लाटेमध्ये सोनं बाजारत 50 हजारांच्या पार गेल्याचं चित्र होतं.

दरम्यान सोन्यात आज वाढ झाल्याचं चित्र असलं तरीही चांदी 0.46 घसरून 68367 वर पोहचली आहे. हा दर चांदीचा प्रति किलो आहे. बाजारभावात सोन्याचे दर वाढण्यामागे आर्थिक क्षेत्रात कोरोना संकटकाळात निर्माण झालेली असुरक्षितता हे एक कारण असते.

रिटेल बाजरातील आजचे दर

आज (19 एप्रिल) दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर 50430 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे. तर, मुंबईमध्ये 46020, चेन्नईमध्ये 48580, कोलकातामध्ये 49020 प्रति तोळे आहे.

मागील वर्षी कोरोना संकट पीक वर असताना म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या काळात सोन्याने देखील उसळी घेतली होती. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर भारतामघ्ये प्रतितोळा 56200 पर्यंत पोहचल्याचं पहायला मिळालं होतं. त्यानंतर त्यामध्ये घटही झाली. मध्यंतरी ते 45 हजारांपर्यंत खाली आलं होतं पण आता पुन्हा देशात कोरोनामुळे स्थिती गंभीर होत असल्याने सोन्याचे दर चढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.