औरंगाबाद महानगरपालिका (PC - Wikipedia.org)

औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी 201 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तसेच 64 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत तब्बल पावणे सहाशे रुग्ण आढळून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडे (Astik Kumar Pandey) यांनी औरंगाबादमधील सर्व शाळा आणि कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

औरंगाबादमध्ये दोन महिन्यांपूर्वीचं शाळा सुरू तसेच आठ दिवसांपूर्वी कोचिंग क्लासेस सुरू झाले होते. परंतु, शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने महापालिका आयुक्तांनी शाळा, कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (वाचा - नागपूर जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नियमावली कडक; शाळा, कॉलेज ते लग्नाचे हॉल बंद करण्याबाबत नितीन राऊत यांनी दिले हे आदेश)

कोरोना रुग्णात सतत वाढ होत असल्या कारणाने औरंगाबाद शहरात रिक्षाचालक विनामास्क वाहन चालवताना आढळल्यास त्याची रिक्षा जप्त केली जाणार असल्याच्या सूचना पोलिस विभागाने दिल्या आहेत. रिक्षा चालकांनी मास्क न घातल्यास कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी रिक्षाचालकांना तसेच नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आवाहन केलं आहे.

याशिवाय महानगरपालिकेने देखील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही खास उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी विनामास्क बाहेर पडू नये. तसेच सीटी बसमध्ये प्रवास करताना मास्क घालण आवश्यक असून त्याशिवाय बसमध्ये प्रवेश देण्यात येणार नसल्याचं म्हटलं आहे. नागरिकांनी कोरोना संदर्भातील त्रिसुत्रीच्या नियमांचं पालन करण्याच्या सूचना देखील महानगरपालिकेने दिल्या आहेत.