Facebook: पुणेकरांनो सावधान! फेसबूकवर मुलींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्याआधी 'ही' माहिती नक्की वाचा; अन्यथा मिळेल धोका
प्रातिनिधिकन प्रतिमा (Photo Credits: Cnet)

सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून फसवणुकीचे दररोज नवीन प्रकार समोर येऊ लागले आहेत. दरम्यान, सोशल मीडियाचा वापर करताना सावधानता बाळगा, असे आवाहन पोलिसांकडून वारंवार केले जात आहे. मात्र, असे असताना पिंपरी चिंचवडच्या कासारवाडी, भोसरी परिसरात तरुणांची ऑनलाईन प्रेम प्रकरणातून फसवणूक होत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरातील 10 ते 12 मुलांना ऑनलाईन प्रेमाने जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक केली आहे. दरम्यान, अशा फसवणूकीला बळी पडू नये म्हणून खालील माहिती अनेकांच्या फायद्याची ठरणार आहे.

लॉकडाऊन दरम्यान फेसबुक, व्हॉट्सअॅप यांसारख्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाली आहे. तर, दुसरी ऑनलाईन फसवणुकीच्या तक्रारीतही मोठी वाढ झाली आहे. यातच पिंपरी चिंचवडच्या परिसरातील अनेक तरूणांची फेसबूकच्या माध्यमातून फसवणूक झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, फेसबूकवर कविता शर्मा, रिया शर्मा, गीता शर्मा, प्रिया शर्मा, सीता शर्मा या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जात आहे. त्यानंतर संबंधित तरुणी मुलांशी गप्पा मारून त्यांचा व्हॉट्सअॅप नंबर मिळवते. तसेच प्रेमात बुडाल्याचे नाटक करत मुलाला व्हीडिओ सेक्सचे आमिष दाखवले जातात. यात मुलगा फसला की तुझा व्हीडिओ रेकॉर्ड केला आहे. पैसे दे, अन्यथा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करू, अशी धमकी देतात. सामाजिक दडपणामुळे अनेक मुले या फसवणुकीला बळी पडले आहेत. हे देखील वाचा- इंस्टग्रामवर परदेशी असल्याचे भासविणाऱ्या तरुणीच्या हनी ट्रॅपमध्ये गिरगावमधील डायमंड ब्रोकरने गमावले 1 कोटी

दरम्यान, अचानकपणे वाढलेल्या या प्रकारामुळे सायबर सेलकडून मोठ आव्हान उभे राहिले आहे. तसेच अशाप्रकारच्या फसवणुकीपासून तरूणांनी सावध राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. महत्वाचे म्हणजे, पुणेच नव्हेतर, कोणत्याही शहरातील तरूणांना अशा पद्धतीने फसवले जाऊ शकते. त्यामुळे ऑनलाईन प्रेमाच्या भानगडीत पडून प्रत्यक्षात अडचणीत येण्यापेक्षा अलर्ट राहणे गरजेचे आहे.