थर्टी फर्स्ट च्या निमित्ताने गडकिल्ल्यांवर दारू पिऊन हुल्लडबाजी करणा-यांना आळा घालण्यासाठी यंदा महाराष्ट्रातील अनेक गडकिल्ल्यांवर विशेष काळजी घेण्यात आली होती. असे असताना देखील माथेरानच्या (Matheran) पेब किल्ल्यावर (Peb Fort) 31 डिसेंबरच्या रात्री सुरु असलेली दारू पार्टी करणा-या 11 तरुणांची पार्टी तेथील स्थानिक तरुणांनी आणि शिवभक्तांनी उधळून लावल्याची घटना समोर आली आहे. हे तरुण मुंबईहून पेब किल्ल्यावर थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करण्यासाठी आले होते. या तरुणांनी गांजाचेही सेवन केले होते. अशा तळीरामांना अद्दल घडविण्यासाठी शिवप्रेमींनी त्या तरुणांचे कपडे काढून त्यांना चांगलाच चोप दिला. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी 31 डिसेंबर रोजी मुंबईतील 11 तरुण पेब किल्ल्यावर गेले होते. मात्र किल्ल्यावर जाताना त्यांनी स्वत:बरोबर दारुच्या बाटल्या आणि नशा करण्यासाठी अंमली पदार्थही नेले होते. या तरुणांनी रात्री मद्यपान करुन नशेच्या वस्तूंचे सेवन केले आणि ते किल्ल्यावर गोंधळ घालू लागले.
व्हायरल व्हिडिओ:
हेदेखील वाचा- नववर्षाच्या निमित्ताने गडकिल्ल्यांवर अनुचित प्रकार घडू नये म्हणून तळीरामांवर ग्रामस्थांनीच आणली 'बंदी'; कोणती आहेत ही ठिकाणे
या किल्ल्याजवळील स्थानिक तरुणांना आणि शिवप्रेमींना हा सर्व प्रकार समजताच त्यांना घटनास्थळी धाव घेतली. त्या तरुणांना विचारपूस केली असता हे सर्व मुंबईहून आलेले परप्रांतीय होते असे या व्हिडियोमध्ये दिसत आहे. नशेत असणाऱ्या या तरुणांना पकडून आणि त्यांना शुद्धीवर आणण्याचे काम या शिवभक्तांना करावे लागले. त्यांच्या अंगावरील कपडे काढून त्यांना माफी मागायला लावली.
या गडकिल्ल्यावर पुन्हा अशाप्रकारचे कोणतेही वर्तन होणार नाही अशी कबुली या तरुणांकडून वदवून घेतल्यानंतरच त्यांना सोडण्यात आलं. अनेकदा सांगूनही गडकिल्ल्यांवर मद्यापान करुन धिंगाणा घालणाऱ्या तरुणांच्या बातम्या समोर येतात. मात्र तात्पुरती कारवाई करुन अशी प्रकरणे निकाली काढली जातात. असे प्रकार होऊ नयेत यासाठी काहीतरी नियमावली आणि कायदा करावा अशी मागणी शिवप्रेमी मागील अनेक वर्षांपासून करत आहे.