अकोला: एका बेपत्ता मुलीचा शोध घेण्यात निष्काळजीपणा दाखवणाऱ्या 2 पोलिसाचे निलंबन
प्रतीकात्मक फोटो | (PTI photo)

अकोला येथील एका बेपत्ता मुलीचा शोध घेण्यात निष्काजीपणा दाखवणाऱ्या 2 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर, जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर (Amogh Gavkar) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) ज्या ठिकाणी महिला अत्याचारांच्या घटना होतील. अशा ठिकाणी त्यांच्या तक्रारी दाखल झाल्या नाहीत तर, पोलिसांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी अधिवेशनात दिले होते. मिळालेल्या माहितीनुसार, किरण ठाकूर (Kiran Thakur) यांची मुलगी गेल्या सहा महिन्यांपासून बेपत्ता असून या संदर्भात पोलीस अधिकारी भानुप्रताप मढावी ( Bhanu Pratap Madhavi) श्रीमती कराळे (Shrimati Karale) हे प्रकरणात गंभीरता दाखवत नसल्याचे समोर आले आहे. तसेच पोलिसांच्या या कामगिरीवर अकोल्यातील लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अकोल्यातील रहिवासी किरण ठाकूर यांची मुलगी गेल्या 6 महिन्यांपासून बेपत्ता आहे. याप्रकरणी त्यांनी अकोला सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आधी टाळाटाळ केली. तक्रार नोंदवून घेतल्यानंतर तपास करण्यात टाळाटाळ केली. त्यामुळे ठाकूर यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून मुलगी अल्पवयीन असल्याने तिला तात्काळ कोर्टात हजर करण्याची विनंती कोर्टासमोर केली. यासंदर्भात कोर्टाने पोलिसांना प्रश्न विचारले असता पोलिसांना काहीही उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे कोर्टाने अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. अकोल्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक मुली बेपत्ता झाल्याचे समोर आले. त्यापैकी एकाही मुलीचा शोध घेण्यात आला नाही. यामुळे पोलिसांच्या या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. हे देखील वाचा- नवी मुंबई: 15 विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या महापालिका शाळेच्या शिक्षकाला 2 मार्च पर्यंत पोलीस कोठडी

दरम्यान, किरण ठाकूर यांनी आज पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन त्यांनाही आपली कैफियत ऐकवली होती. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी किरण ठाकूर यांच्याशी संवाद साधला. तसेच आपली मुलगी बेपत्ता झाली असून पोलिसांकडून सहकार्य मिळत नाही. त्यामुळे फिर्यादी किरण ठाकूर यांनी नाइलाजाने कोर्ट गाठले. त्यामुळे अकोल्याचे पोलीस अधीक्षक त्यांच्यावर चिडले. तसेच वारंवार पोलीस अधीक्षकांकडून त्यांना नको त्या धमक्याही येऊ लागल्या होत्या. तुम्ही कोर्टात का गेले? मीडियात का गेले? आता आम्ही तपास करणार नाही, असे स्थानिक पोलीस त्यांना म्हणाला होते. अनेकदा तक्रार करण्यासाठी गेले असताना पोलिसांनी त्यांना हाकलून दिले होते. किरण ठाकूर यांनी आज गृहमंत्री अनिल देशमुख यांचीही भेट घेऊन यासंदर्भात त्यांना माहिती दिली. याची दखल घेत अनिल देशमुख यांनी पोलिसांवर कारवाई केल्याची सांगितले आहे.

दरम्यान, 15 ऑगस्ट ते 14 ऑक्टोबर 2019 या कालावधीत अकोल्यातून 35 मुली गायब झाल्याचे सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यातून 2 महिन्यातच एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुली बेपत्ता झाल्यानंतरही एकाही मुलीचा पोलिसांना शोध घेता आलेला नसल्याचेही माहिती समोर आली आहे.