Akhil Bhartiya Sahitya Sammelan started from today: निमंत्रणवापसी, साहित्यिकांचा बहिष्कार, पदाधिकाऱ्यांचे राजीनामे आणि आयोजकांनी घातलेला घोळ, अशा एक ना अनेक कारणांमुळे उद्घाटनापुर्वीच गाजलेल्या 92 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनास आजपासून (शुक्रवार, 11 जानेवारी) सुरुवात होत आहे. यंदाचे संमेलन हे यवतमाळ (Yavatmal) येथे पार पडत आहे. सकाळी आठ वाजता निघालेल्या ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात झाली. समता मैदानातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरीत हे संमेलन चालणार आहे. या संमेलनावर मराठीतील बहुसंख्य साहित्यिकांनी बहिष्कार टाकला आहे. तरीसुद्धा अनेक साहित्यिक संमेलनाच्या मंडपात हजेरी लावण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ज्येष्ठ कवयित्री, ललित लेखिका, समीक्षक डॉ. अरुणा ढेरे अध्यक्षा असलेल्या संमेलनाचे उद्घाटन आज दुपारी 4 वाजता होणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमास मराठी भाषा व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, पूर्वाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, महामंडळाच्या हंगामी अध्यक्ष विद्या देवधर, स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री मदन येरावार, कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते उपस्थित राहणार आहेत. संमेलन अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे या 91व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. (हेही वाचा, वाद मिटला : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी करणार साहित्य संमेलनाचे उद्घाटन)
दरम्यान, संमेलनात कविकट्टा, चर्चासत्र, परिसंवाद, वऱ्हाडी कविता, टॉक शो, काव्यवाचन, असे विविध कार्यक्रम होतील. संमेलनात आलेल्या रसिकांची गैरसोय होऊ नये यासाठी आयोजकांनी जवळपास 300 स्वयंसेवकांची नेमणूक केली आहे. तब्बल 45 वर्षांनंतर यवतमाळला संमेलनाच्या आयोजनाचा मान मिळाला आहे.