Shiv Sena-NCP Alliance: आता तसलं काही डोक्यात नाही, तेव्हा पत्रकार परिषद घेऊन सांगतो- अजित पवार
Ajit Pawar | (File Photo)

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस (Shiv Sena-NCP) यांच्यात होणाऱ्या संभाव्य युतीबाबत (Shiv Sena-NCP Alliance) दोन्ही पक्षांचे नेते सूचक विधाने करत आहेत. ही विधाने आणि प्रसारमाध्यमांतून येणाऱ्या वृत्तांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनाच प्रसारमाध्यमांनी विचारले. यावर बलोतना अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. ज्या वेळी निवडणुका जाहीर होतील तेव्हा याबबत पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणे सांगितले जाईल. आता सध्या तरी असलं काही डोक्यात नाही. सध्या किमान समान कार्यक्रमावर अधारीत मुद्द्यांवर काम सुरु असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. पुणे (Pune) येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यात महाविकासआघाडी सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. भविष्यातही या पक्षांना एकत्र येऊन काम करावे लागेल असे वक्तव्य राष्ट्रवादीकाँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापनदिनी केले होते. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही काँग्रेस स्वबळावर लढेन असे म्हटले होते. यावर शिवसेना मुखपत्र दैनिक सामना संपादकीयामध्ये राज्याच्या हीताचा विचार करुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला एकत्र यावे लागेल अशी दोन्ही पक्षांच्या प्रमुखांची इच्छा असल्याचे म्हटले होते. या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवार यांना प्रसारमाध्यमांनी विचारले होते. यावर अजित पवार यांनी शिवसेना पक्षाला वर्धापण दिनाच्या शुभेच्छा देत म्हटले की, सर्वांना आपापला पक्ष वाढविण्याची पूर्ण मुभा आहे. परंतू, सध्या तसले काही डोक्यात नाही. किमान समान कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही जी भूमिका स्वीकारली आहे. ती व्यवस्थित पार पाडण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. (हेही वाचा, Shiv Sena-NCP Alliance: 'महाराष्ट्र हितासाठी शिवसेना-राष्ट्रवादीला एकत्र यावे लागेल', महाविकासआघाडी सरकारमधील घटक पक्षाचा काँग्रेसला सूचक इशारा)

अजित पवार यांनी लॉकडाऊन शिथील होताच नागरिक करत असल्येल्या प्रचंड गर्दीवरुनही नाराजी व्यक्त केली. लॉकडाऊन शिथील होताच अनेक लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. हे योग्य नाही. अमेरिका, इंग्लंडसारख्या विकसीत देशात कोरोनाचे लसीकरण होऊनही तिसरी लाट येऊ घातली आहे. त्याचा सावधानतेने विचार करता आपण वेळीच जागे व्हायला हवे. कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तिसऱ्या लाटेत कोरोनाचा फटका लहान मुलांना अधिक बसू शकतो असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. मला कोणाला घाबरवायचे नाही. परंतू, पालकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे अजित पवार म्हणाले.

पुणेकरांनी जर कोरोना नियमांचे योग्य पद्धतीने पालन केले नाही. तर पुन्हा एकदा निर्बंध अधिक कडक करावे लागतील, असेही अजित पवार यांनी सांगितले. तसेच, पुण्यात शनिवार, रविवारी काही सेवा आणि दुकाने बंद राहतील असा निर्णय घेण्यात आल्याचेही सांगितले.