सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दणका दिल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने आज (16 एप्रिल) प्रसारमाध्यमांनी अधिकृतरित्या निवेदन जारी केले आहे. या निवेदनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ (NCP Election Symbol) या निवडणूक चिन्हाबाबत विशेष उल्लेख करुन माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह 'घड्याळ' याबाबतचा वाद न्यायप्रविष्ठ आहे. या प्रकरणाचा खटला सर्वोच्च न्यायालयात अद्यापही सुरुच आहे. त्यामुळे कोर्टाच्या अंतिम निकालावरच पक्षाचे नाव आणि चिन्ह कोणाला मिळणार याबाबत फैसला होणार आहे. त्यामुळे त्याबाबतचा उल्लेख करुन हे निवदेन प्रसिद्ध करण्यात आले आहे. या अजित पवार यांच्या पक्षाने या आधीही एक निवेदन जारी केले होते. मात्र, त्यात अनेक त्रूटी असल्याचा अक्षेप घेत शरद पवार (Sharad Pawar) यांचा पक्ष कोर्टात गेला होता. त्यानंतर आता हे निवेदन प्रसिद्धीस आले आहे.
काय म्हटल आहे निवेदनात?
''भारत निवडणूक आयोगानं अजित अनंतराव पवार यांच्या नेतृत्वाखालील नॅशनालिस्ट ( राष्ट्रवादी) काँग्रेस पार्टीला ‘‘घड्याळ’’ हे चिन्ह दिलं आहे. हे प्रकरण सध्या माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर न्याय प्रविष्ट आहे. अंतिम निकालाच्या आधीन राहून माननीय सर्वोच्च न्यायालयानं मध्यंतरी नॅशनालिस्ट ( राष्ट्रवादी) काँग्रेस पार्टीला आगामी सर्व निवडणुकांसाठी ‘‘घड्याळ’’ हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे.'' (हेही वाचा, Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा हाय होल्टेज ड्रामा! बारामतीत सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का; सुळे यांचे प्रचारप्रमुख सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार)
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वृत्तपत्रांमध्ये जवळपास चार कॉलम इतक्या जागेत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये ठळक अक्षरात नॅशनालिस्ट (राष्ट्रवादी) काँग्रेस पार्टी असा स्पष्ट उल्लेख आहे. त्यासोबतच घड्याळ हे निवडणूक चिन्ह आणि अजित पवार यांचा ठळक आणि मोठी प्रतिमा राष्ट्रीय अध्यक्ष या पदासह छापण्यात आली आहे. (हेही वाचा :Lok Sabha Election 2024: बारामतीमध्ये वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या पाठिंब्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी मानले आभार ! )
सुप्रिम कोर्टात नावाचा वाद सुरु असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्याच्या घड्याळ चिन्हासोबत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा घटक पक्ष आहे. महायुतीमध्ये भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रमुख पक्ष आहेत. सध्या देशभरात लोकसभा निवडणूक सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने आपले उमेदवार उभे केले आहेत. हे सर्व उमेदवार घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. हे उमेदवार जरी निवडूण आले तरीही त्यांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अधिक अवलंबून असणार आहे. आज प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिद्ध झालेले निवेदन हे तेच दर्शवत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.