महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि विरोधक यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून अनेक संघर्षाचे प्रसंग समोर आले आहेत. शाब्दिक बाचाबाची आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या आहेत. यामध्ये नुकत्याच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहात केलेल्या आरोपाबाबतीत आता त्यांना पोलिस नोटीस मिळाली आहे. सायबर सेल कडून त्यांना चौकशीकरिता नोटीस आली होती मात्र आता फडणवीस यांना पोलिस स्टेशन मध्ये न जाता पोलिसच त्यांच्या घरी जाऊन जबाब नोंदवणार आहेत. यावर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीपण्णी केली आहे.
मीडीयाशी बोलाताना अजित पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये सर्वच राजकीय पक्षांना जबाबदारीने वागण्याचं आवाहन केले आहे. देशात, महाराष्ट्रात यापूर्वी अशी परिस्थिती कधीच नव्हती. नोटिसा देणं, वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करणं यापूर्वी घडलेले नाही. पंतप्रधानांसमोर देखील त्याबाबत अजित पवारांनी स्पष्टपणे वक्तव्य केले आहे. प्रत्येकानं आपापलं काम करावं. जनतेनं ज्यांना पाठिंबा दिला आहे, त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं असं मत त्यांनी मांडलं आहे. राजकीय नेतेमंडळींच्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये लोकांना अजिबात रस नसल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.
अजित पवार आज पुण्यामध्ये 31 विविध ठिकाणी कार्यक्रमांमध्ये हजेरी लावणार आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून त्यांच्या कामाला सुरूवात झाली आहे. हे देखील नक्की वाचा: Phone Tapping Case: फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पोलीस करणार आज चौकशी, भाजपचं राज्यभर आंदोलन .
आयपीएस ऑफिसर रश्मी शुक्ला फोन टॅपिंग केस मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी काही खळबळजनक आरोप केले आहेत. त्याचे पुरावे केंद्र सरकारकडे सुपूर्त केले आहेत. दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांना काही अधिकार आहेत. त्याअंतर्गत माहितीचे स्त्रोत गुप्त ठेवण्याचा अधिकार त्यांना आहे असे ते म्हणाले आहेत. त्यामुळे पोलिस याप्रकरणी त्याबाबत माहिती विचारू शकत नाही असा दावा त्यांनी केला आहे.