अहमदनगर: विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात भीषण आग; 5 कामगार गंभीर जखमी
विखे पाटील सहकारी कारखाना (PC - Facebook)

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात (Vikhe Patil Cooperative Sugar Factory) लागलेल्या भीषण आगीत (Fire) 5 ते 6 कामगार होरपळले आहेत. त्यांच्यावर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. आज सकाळी 11 वाजताच्या दरम्यान ही आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.

दरम्यान, गँमन इंडिया या खासगी कंपनीने प्रवरा रिन्योएबल एनर्जी लिमिटेड नावाचा उर्जा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पामध्ये आज सकाळी 11 वाजता काही कामगार वेल्डींगचे काम करत असताना वेल्डींगच्या ठिंणग्या खाली असलेल्या दगडी कोळसावर पडल्या. त्यामुळे येथे भीषण आग लागली. या आगीमुळे त्या परिसरात असलेल्या बॉयलर गॅसनेदेखील पेट घेतला. त्यामुळे आगीची तीव्रता आणखी वाढली. येथे काम करणाऱ्या कामगांरांना आगीमुळे बाहेर पडणं मुश्किल झालं. यात पाच कामगार गंभीर होरपळले आहेत. (हेही वाचा - Coronavirus Outbreak In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या वाढत्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर काय राहणार सुरु आणि काय बंद? घ्या जाणून)

या आगीत होरपळलेल्या कामगारांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या यातील दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नामुळे या आगीवर नियंत्रण मिळवता आले आहे. आगीने क्षणात रौद्र रुप धारण केल्यामुळे विखे पाटील साखर कारखाना परिसरात आगीचे लोळ दिसू लागले. विखे पाटील सहकारी कारखान्याचे अध्यक्ष आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मदतकार्य करण्यासाठी सुचना दिल्या.