महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Elections 2019) पूर्व प्रचाराला आता शेवटचा तासभर शिल्लक असताना सर्वच राजकीय पक्षांनी उत्साहात सभा आणि शक्तिप्रदर्शने करण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान काही ठिकाणी पावसाचे वातावरण असल्याने अडचणी येत आहेत. या वातावरणाचं सर्वात मोठा फटका हा अमित शहा (Amit Shah) यांना बसला आहे. प्राप्त माहितीनुसार आज, अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील अकोले (Akole) येथे कर्जत- जामखेड (Karjat-Jamkhed) मतदारसंघात शहा यांची सभा होणार होती, या सभेसाठी शहा यांनी नाशिक वरून हेलिकॉप्टरमार्गे जाण्याचा प्लॅन सुद्धा तयार होता मात्र ऐन वेळी ढगाळ वातावरणामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग करावी लागली आणि सभेसाठी दिरंगाई झाली, यानंतरसुद्धा सभा घेण्यासाठी शहा यांनी ओझर येथून शिर्डी विमानतळावर धाव घेतली मात्र काही केल्या वातावरण स्थिर होत नसल्याने उड्डाण शक्य नाही आणि परिणामी आज शहा यांची सभा रद्द करण्यात आली आहे.
दुसरीकडे, कर्जत- जामखेड हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या दृष्टीने अतिशय फायद्याचे ठिकाण मानले जाते, या जागेसाठी शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. याठिकाणचा राजकीय इतिहास पाहता आजची शहा यांची सभा महत्वाची होती याचा अंदाज येतो. दुसरीकडे,शहा यांना शक्य नसले तरी शरद पवार यांनी कर्जत मध्ये रोहित यांच्यासाठी सभा घेऊन प्रचार केल्याचे सुद्धा समजत आहे.
शरद पवार यांनी सभेतील भाषणात रोहित यांना मतदान करण्याचे आवाहन करत निवडणूक आल्यास रोहित हेच कर्जतचा चेहरा मोहरा बदलतील असे आश्वासन दिले आहे. तसेच आपल्या भाषणातून शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सह सत्ताधारी पक्षाला चांगलेच टार्गेट करत कर्जत- जामखेड मतदारसंघ सभा घेण्यासाठी महत्वाचा वाटला नाही का? असा सवाल केला होता.
पावसात भिजत सातारा येथे शरद पवार तर, कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवार बरसले
दरम्यान, अवघ्या काहीच वेळात आता प्रचारसभांच्या तोफा थंडावल्या जाणार आहेत. या सर्व परिश्रमाचे परिणाम येत्या २१ ऑक्टोबर रोजी मतदानात आणि 24 ऑक्टबर रोजी निवडणूक निकालात स्पष्ट होतील.