चंद्रकांत पाटील (Photo credit : facebook)

गेल्या काही दिवसांमध्ये सत्ताधारी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारमधील तीनही पक्षांमधील छोटे-मोठे मतभेद पहायला मिळाले आहेत. आता 10 मार्चनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला सत्ता सोडावी लागणार असून, त्यांच्या नेत्यांना घरी बसावे लागणार आहे, असे खळबळजनक विधान भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले आहे. शनिवारी दिलेल्या या निवेदनात त्यांनी महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे भाकीत त्यांनी वर्तवले.

राज्यातील सरकार पडण्याची कारणेही त्यांनी दिली आहेत. ठाकरे सरकारमधील अंतर्गत मतभेद शिगेला पोहोचले असून त्यांचे नेते एकामागून एक तुरुंगात जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच 10 मार्च रोजी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी सरकारला सत्ता सोडावी लागेल, अशी स्थिती येईल, असे ते म्हणाले. चंद्रकांत पाटील म्हणाले, 'महाविकास आघाडी सरकारची सध्याची स्थिती पाहिल्यास हे सरकार फार काळ टिकणार नाही, असा निष्कर्ष काढता येईल.’

ते पुढे म्हणाले, ‘आघाडीच्या नेत्यांमधील मतभेद अधिकच गडद झाले आहेत. दोन मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. बाकीच्या बाबतीतही तेच होणार आहे.’ त्यांनी पुढे असेही सांगितले की, ‘राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या बाबतचे पत्र हे अनिल देशमुख यांच्याकडून यायचे. याबाबत अनिल देशमुख म्हणायचे की त्यांना ते पत्र अनिल परब यांच्याकडून यायचे. तसेच परमबीर यांनी सांगितले की, वाझे यांना परत कामावर घेण्यासाठी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे हे माझ्यावर दबाव आणायचे. ही सारी प्रकरणे गुन्हेगारी प्रकरणे आहेत.’ त्यामुळे हे सरकार जास्त काळ टिकणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. (हेही वाचा: Ashish Shelar On MVA: सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या अहंकाराला वाईट रीतीने ठेचले, भाजपचे आमदार आशिष शेलारांचे वक्तव्य)

दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या पक्षपाती कारवाईची तक्रार चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांकडे केली होती. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी हे विधान केल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.