
नवरात्री दरम्यान आज ठाण्यात टेंभीनाक्याच्या दुर्गे दुर्गेश्वर देवीच्या (Durge Durgeshwari Tembhi Naka Devi) दर्शनाला गेल्यानंतर रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी देखील गेल्या होत्या. दरम्यान ठाण्यात देवीच्या दर्शनात शिवसेनेने आज शक्तिप्रदर्शन केले. आज रश्मी ठाकरे टेंभीनाक्याच्या देवीच्या दर्शनाला येणार आणि आरती करणार असं ठरल्यानंतर आज ठाण्यात शिंदे गट विरूद्ध ठाकरे गट असा पुन्हा संघर्ष पेटणार का? असा प्रश्न होता. पण रश्मी ठाकरे 5च्या सुमारास आल्या आणि त्यांनी दर्शन घेऊन, ओटी भरून त्यांनी देवीची खास आरती केली. पण यानंतर घरी परतत असताना रश्मी ठाकरे मुलुंड मध्ये संजय राऊतांच्या घरी देखील भेट देण्यासाठी गेल्या होत्या. त्यामुळे आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंच्या पाठोपाठ रश्मी ठाकरेही मैदानात उतरल्याच्या चर्चा आहेत.
संजय राऊत हे सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक, राज्यसभा खासदार आहेत. मात्र 31 जुलै पासून ते पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने अटक केल्यानंतर तुरूंगात आहेत. राऊतांच्या अटकेनंतर काही दिवसांनी उद्धव ठाकरे राऊतांच्या घरी पोहचले होते. रश्मी ठाकरे देखील आज त्यांच्या घरी गेल्या. काही दिवसांपूर्वी गोरेगाव मध्ये शिवसेना पक्ष संघटकांचा मेळावा झाला तेव्हा देखील व्यासपीठावर संजय राऊतांची खूर्ची रिकामी ठेवण्यात आली होती.
View this post on Instagram
संजय राऊत यांच्या घरी त्यांचे बंधू सुनील राऊत, त्यांची आई, संजय राऊतांची पत्नी, लेक राहतात. आज त्यांची भेट घेऊन रश्मी ठाकरे यांनी चौकशी केली आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांचा जामीन सुनावणीसाठी घेण्यात आला होता पण त्यावर ईडीला उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा दसरा देखील तुरूंगात जाणार आहे.
टेंभीनाक्याला देवीचं दर्शन घेण्यापूर्वी रश्मी ठाकरे आनंंद दिघे यांच्या आनंदश्रमातही पोहचल्या होत्या. तेथे त्यांनी त्यांच्या प्रतिमेला हार घातला. आनंद दिघे यांनीच दुर्गेश्वर देवीचा जागर सुरू केला होता. तेव्हा बाळासाहेब ठाकरे सपत्नीक या देवीची ओटी भरत असे आता तो वसा रश्मी ठाकरे जपत असल्याचं केदार दिघेंनी सांगितले आहे.