Anil Deshmukh यांच्या गृहमंत्री पदाच्या राजीनाम्यानंतर कोण होऊ शकतं नवे गृहमंत्री? हसन मुश्रीफ, दिलिप वळसे पाटील यांच्यासह ही नावं चर्चेत!
New HM OF Maharashtra | File Photos

100 कोटींच्या वसुली चे आदेश दिल्याचे खळबळजनक आरोप अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर झाल्यानंतर आता त्यांच्याभोवती सीबीआय चौकशीचा फेरा आवळला गेला आहे. दरम्यान या प्रकरणात आता सीबीआय कडून चौकशीचे आदेश असताना पदावर राहणं उचित नसल्याचं सांगत अनिल देशमुखांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केला आहे. आणि या रिक्त जागेवर नवे गृहमंत्री म्हणून कोण विराजमान होणार या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान अजित पवार (Ajit Pawar), जयंत पाटील (Jayant Patil), दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil), हसन मुश्रीफ (Hasan Mushirf) या एनसीपी नेत्यांची नावं चर्चेमध्ये आहेत. लवकरच एनसीपी नेते शरद पवार (Sharad Pawar)  नव्या गृहमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला गृहमंत्रिपदाचा राजीनामा, काय आहे संपूर्ण प्रकरण, वाचा सविस्तर.

कोण होऊ शकतं नवे गृहमंत्री

अजित पवार

अजित पवार हे त्यांच्या सडेतोड स्वभावामुळे ओळखले जातात. राज्यातील सध्याची कोविड 19 मुळे बिघडलेली स्थिती आणि विरोधकांचा सामना करण्याची गरज पाहता अजित पवारांवर अजून एक जबाबदारी पडण्याची शक्यता आहे.

जयंत पाटील

काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखामध्ये जयंत पाटीलांनी गृह मंत्री पदाची जबाबदारी नाकारली गेल्याने अपघाताने अनिल देशमुख गृहमंत्री झाल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे आता एनसीपी आणि सरकारच्या डॅमेज कंट्रोल साठी जयंत पाटलांचा अनुभव पुन्हा कामी येणार का? हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

दिलीप वळसे पाटील

जयंत पाटलांप्रमाणेच मागील वेळेस दिलीप वळसे पाटील यांनी देखील प्रकृती अस्वास्थ्यामुळे गृहमंत्री पद नाकारलं होतं पण आता त्यांच्याकडे पुन्हा एक संधी चालून आली आहे. सध्या ते उत्पादक शुल्क खात्याचे मंत्री आहेत. संजय राऊत यांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 'रोखठोक' मधून निशाणा; 'पोलिस खात्याचं नेतृत्त्व 'सेल्यूट' साठी नव्हे कणखर नेतृत्त्व देण्यासाठी' म्हणत सल्ला.

हसन मुश्रीफ

हसन मुश्रीफ देखील एनसीपीचे जुने नेते आहेत. ग्रामविकास मंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. दरम्यान शरद पवारांचे जुने साथीदार म्हणून ते ओळखले जातात. त्यामुळे आता त्यांच्याकडे या लॉयटीची भेट म्हणून गृहमंत्रीपदाची जबाबदारी येऊ शकते.

दरम्यान कोणत्याही मंत्र्यांची जागा रिकामी झाल्यास नियमाप्रमाणे त्या खात्याची जबाबदारी राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांकडे येते. त्यामुळे सध्या गृहमंत्री पदाची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः सांभाळत आहेत.