Global Warming: तापमान वाढीबाबत आदीत्य ठाकरे यांचा सातारा येथे इशारा 'भविष्यात प्रश्न गंभीर'

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी जागतीक तापमान (Global Warming) वाढीबद्दल गंभीर इशारा दिला आहे. आगामी काळात जागतिक तापमानवाढ हा गंभीर प्रश्न बणणार आहे. त्यामुळे काळाची पावले ओळखून आतापासून उपाययोजना करायला हव्यात असे आदित्य ठाकरे म्हणाले. तापमानवाढ ही जागतिक समस्या आहे. तापमानवाढीचे फटके जगभर पाहायला मिळतात. त्यातून अवेळी पाऊस, गारपीट, दुष्काळ, ढगफुटी इत्यादी घटना वारंवार घडताना दिसतात. हे प्रश्न भविष्यात अधिकच गंभीर होतील. त्यामळे वाहतुकीसाठी कमीत कमी साधने वापरणे सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे, इलेक्ट्रिकल वाहने वापरणे, सोलर एनर्जी वापरणे, गोबर गॅसचा वापर करणे, जल व वायू प्रदूषण होणार नाही याची खबरदारी घेणे यांसारख्या गोष्टींची आवश्यकता असल्याचे मतही आदित्य ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केले.

सातारा जिल्हा बँक व दि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज यांच्या संयुक्त विद्यमाने ग्लोबल वॉर्मिग -ग्लोबल वॉर्निग परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर होते . यावेळी कार्यक्रमास सहकार तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे, पर्यावरण तज्ञ खा. वंदनाताई चव्हाण, बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले,मकरंद पाटील, शेखर गोरे, दत्तानाना ढमाळ, सत्यजित पाटणकर, सुरेश सावंत,प्रदीप विधाते आदी मान्यवर उपस्थित होते. (हेही वाचा, Aditya Thackeray On Electric Vehicles: सरकारी ताफ्यातील सर्व वाहने इलेक्ट्रिक असतील; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची मोठी घोषणा)

तापमान वाढीमुळे निर्माण होणाऱ्या भविष्यातील समस्या विचारात घेऊन आतापासून दीर्घकालीन उपाययोजना करायला हव्यात. जसे की, सांडपाणी आणि कचऱ्याचे व्यवस्थापन. पेट्रोल, डिझेल ऐवजी इंधन म्हणून सौर उर्जेचा वापर करणे. जास्तित जास्त प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणे आवश्यक असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.