Congress candidate actress Urmila Matondkar | Photo credit: Facebook pg / realurmilamatondkar

उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष (Congress Party) सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षातील त्यांची एक्झीट राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांमध्येही चर्चेचा विषय ठरली आहे. प्रदीर्घ काळ अभिनय क्षेत्रात व्यतीत केल्यानंतर मातोंडकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, काँग्रेस पक्ष नेतृत्वानेही त्यांच्यावर विश्वास दाखवत लोकसभा निवडणूक 2019 मध्ये त्यांना उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून (North Mumbai Lok Sabha Constituency)  थेट उमेदवारी दिली होती. भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासोबत त्यांची राजकीय टक्कर झाली.

आपल्या राजीनाम्याचे कारण देताना मातोंडकर यांनी म्हटले आहे की, समाजसेवेचा उदात्त हेतू ठेऊन आपण राजकारणात आलो. खास करुन काँग्रेस पक्षात आलो. मात्र, पक्षांतर्गत असलेल्या वादामुळे आपल्या हेतूला बाधा येत असल्यानेच आपण काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत आहोत. मातोंडकर यांच्या राजीनाम्याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. (हेही वाचा, उर्मिला मातोंडकर राजकारणात कशा आल्या? त्यांनी काँग्रेस पक्षच का स्वीकारला?)

एएनआय टविट

उर्मिला मातोंडकर यांचा राजकारणात प्रवेश अनेक कारणांसाठी चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान, बॉलिवूडमधील चर्चीत चेहरा यापलीकडे त्यांची ओळख काय? अशी उपहासात्मक टीकाही मातोंडकर यांच्यावर त्यांच्या राजकीय प्रवेशानंतर झाली होती. प्रत्यक्षात मात्र उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांनी भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी यांना जोरदार टक्कर दिली होती. आपली भाषणं, वृत्तवाहिन्यांवर दिलेल्या मुलाखती यातून आपल्या वैचारीक भूमिका आणि अभ्यास यांची चुणूक मातोंडकर यांनी मोठ्या खुबीने दाखवली होती.

उर्मिला मातोंडक यांनी राजकीय प्रवेश का केला? याबाबत एका मुलाखतीत स्वत: मातोंडकर यांनीच स्पष्टीकरण दिले होते. त्या म्हणाल्या होत्या,  'खरं म्हणजे मला माझं खासगी आयुष्य जपायला आवडतं. मला कोणाच्याही खासगी आयुष्यात डोकावायला आवडत नाही. मी जे काही समाजकार्य किंवा छोट्यामोठ्या गोष्टी माझ्या परीने, माझ्या पातळीवर करत असते, त्याचे जाहीर प्रदर्शन मला आवडत नाही. त्यामुळेच तर मी आतापर्यंत केलेल्या कामाला प्रसिद्धी दिली नाही. पण, राजकीय आणि सामाजिक वर्तुळातील बऱ्याच लोकांना माझे काम माहिती होते. त्यामुळे अनेक राजकीय पक्षांकडून गेली अनेक वर्षे मला राजकारणात प्रवेश करण्यासाठी ऑफर होत्या. परंतू, थेट राजकारणात जावे असे मला कधी वाटले नव्हते. पण, आता मी राजकारणात आले आहे. मॅक्स महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे स्पष्टीकरण दिले होते.