Rajesh Tope On COVID19: महाराष्ट्राने मृत्यू लपवल्याचा आरोप अजिबात सहन केला जाणार नाही- राजेश टोपे
Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकारला यश आल्याचे चिन्ह दिसत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या 50 ते 60 हजार होती. तर, मृतांची संख्या 900 च्या जवळपास होती. या काळात महाराष्ट्र सरकारने कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांची संख्या लपवली आहे, असे आरोप विरोधकांकडून केले जात होते. हे सर्व आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेटाळून लावले आहे. महाराष्ट्राने कोरोनाचे मृत्यू लपवले, हा आरोप अजिबात सहन केले जाणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला आहे.

महाराष्ट्रातील कोरोना संदर्भात एबीपी माझाशी बोलताना राजेश टोपे म्हणाले की, "सरकार किंवा आरोग्य विभागाने कधीच कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांची संख्या लवपली कधीच लपवली नाही. देशात महाराष्ट्र अॅक्टिव्ह केसेसमध्ये आणि मृतांच्या बाबतीत क्रमांक एकवर होता. ते आम्ही कधीही लपवलेले नाही. महाराष्ट्राच्या बाबतीत मृत्यू लपवले हे आरोप कधीही सहन करणार नाही. हे अत्यंत खोटे आहे. महाविकासआघाडीने मृत्यू लपवलेले नाहीत. खासगी रुग्णालयांनी तिथे झालेल्या मृतांचे आकडे वेळेवर दिले पाहिजेत. बऱ्याचदा खासगी रुग्णालयांकडून 15 दिवस आकडे उशिरा दिले जातात, हे याचे कारण असू शकते. याशिवाय, रिकन्सिलिएशनमुळे देखील मृतांची संख्या पोर्टलवर अपलोड झालेली नसेल. त्यामुळे ही संख्या कमी राहाते, पण ती लपवली असे होत नाही. एकही मृत्यू लपवला जात नाही", असे राजेश टोपे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Covid-19 Vaccination: महाराष्ट्रात 19 जूनपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात; शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून घेता येणार लस

महाराष्ट्रात आज 9 हजार 798 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 198 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 14 हजार 347 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात एकूण 56 लाख 99 हजार 983 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1 लाख 34 हजार 747 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.73% झाले आहे.