Nanded News: धावत्या एसटी बसचा दरवाजा अचानक उघडला, प्रवाशाचा मृत्यू,  कंधार तालुक्यातील शेल्लाळी येथे खराब रस्त्यामुळे एकाचा हाकनाक बळी
Accident | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Accident News Nanded: राज्यातील रस्त्यांची दुरावस्था हा नेहमीच चिंतेचा विषय ठरला आहे. खराब रस्त्यांमुळे अनेकांचे प्राण गेले आहेत. अशीच घटना नांदेड जिल्ह्यातील कंधार (Kandhar) तालुक्यात घडली आहे. धावत्या बसचा दरवाचा खराब रस्त्यामुळे अचानक उघडला. ज्यामुळे बसमधून प्रवास करणारा एक प्रवासी थेट खाली रस्त्यावर पडला. धावत्या बसमधून पडल्याने आणि गंभीर मार लागल्याने या प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. लक्ष्मण शेषेराव गायकवाड (40) असे मृताचे नाव आहे. ही घटना पांगरी ते कंधार रस्त्यावर शेल्लाळी (Shellali) फाटा येथे रविवारी (18 जून) घडली.

पांगरी ते कंधार रस्त्यादरम्यान आंबुलगा येथून साधारण दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेल्लाळी फाटा येथून एसटी बस प्रवास करत होती. मुखेड आगाराची बस क्र. (एम.एच.20 बी. आय. 1618) प्रवासी घेऊन कंधार येथून मुखेडच्या दिशेने निघाली होती. दरम्यान, व्यवसायाने वीट कामगार असलेले लक्ष्मण शेषेराव गायकवाड (वय 40) हे कल्हाळी येथून प्रवास करत होते. दरम्यान, बस शेल्लाळी पाटीजवळ आली आणि बसचा दरवाजा अचानक उघडला. ज्यामुळे बसमध्ये उभे असलेले गायकवाड हे खाली कोसळले. (हेही वाचा, PMPML Bus Hijacked: पुणे येथे धक्कादायक प्रकार, चोरट्याने पळवली पीएमपीएमएल बस; बॅटरी चोरुन पोबारा)

बस सुरु असतानाच हा अपघात घडल्याने गायकवाड यांचा मृत्यू झाला. आंबुलगा ते सावरगाव दरम्यान, रस्त्याचे काम सुरु आहे. पाठीमागील प्रदीर्घ काळापासून हे काम रखडले आहे. त्यामुळे वाहनांचे किरकोळ अपघात आणि त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या दुखापती नित्याच्या होऊन बसल्या आहेत. लक्ष्मण गायकवाड यांचा बळी रस्त्यांच्या दुर्दशेमुळेच हाकनाक झाल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

हातावर पोट असलेले वीट कामगार लक्ष्मण गायकवाड यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, चार बहिणी, दोन भाऊ, आई असा परीवार आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून गुन्हा नोंदविण्याचे काम उशीरपर्यंत सुरु होते.