
महाराष्ट्रामध्ये प्राथमिक, माध्यमिक शाळांना 2 मे पासून सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. तर पुढल्या वर्षीचं शैक्षणिक वर्ष (Academic Calendar For Schools In Maharashtra) 12 जून पासून सुरू होणार आहे. विदर्भामध्ये उन्हाचा कडाका पाहता शाळा 26 जून पासून सुरू होणार आहेत. शिक्षण विभागाने त्याबाबतचं परिपत्रक जारी करत माहिती दिली आहे. त्यामुळे यंदा शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांना 2 मे ते 11 जून सुट्टी असणार आहे.
राज्यात पहिली ते नववी आणि 11वीचे निकाल 30 एप्रिल पर्यंत किंवा नंतर उन्हाळी सुट्टीच्या काळातही जाहीर करता येणार आहे. हा निकाल सुट्टीच्या काळात जाहीर झाला तर तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी शाळेची असणार आहे. दरम्यान शाळेची उन्हाळी रजा आणि दिवाळीची मोठी सुट्टी कमी करून त्या रजा गणेशोत्सव आणि नाताळ दरम्यान देण्याची मुभा देखील शिक्षण अधिकार्यांच्या परवानगीने देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्षातील एकूण सुट्ट्या या 76 पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता शिक्षण अधिकाऱ्यांनी द्यावी अशी माहिती परिपत्रकामध्ये देण्यात आली आहे.
आगामी वर्षामध्ये स्कूल बसच्या शुल्कामध्ये वाढ होणार आहे. स्कूल बस असोसिएशन कडून दरवाढीचा निर्णय झालेला आहे. यामध्ये 15-20% दरवाढ होणार आहे. वाढते इंधनदर पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. NCERT Textbooks: एनसीईआरटी द्वारे पाठ्यपुस्तकांमध्ये बदल; इयत्ता 12 वी इतिहासातून मुघल साम्राज्यावरील धडा हटवला .
दरम्यान राज्यात 10वी, 12वी च्या परीक्षा पार पडल्या आहेत. त्याचे निकालही वेळेवर लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या महिन्यात काही दिवस शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सुट्टीवर होते. त्याचा परिणाम पेपर तपासणीच्या कामावर होईल असा अंदाज होता परंतू आता बोर्डाकडून यंदा निकाल वेळेत लावले जातील अशी माहिती देण्यात आली आहे. मागील वर्षी 10 ते 17 जून दरम्यान बोर्डाच्या परीक्षेचे निकाल लागले होते.