Abdul Karim Telgi, Stamp scam case: संपूर्ण राज्यासरह देशभरात खळबळ माजवणाऱ्या मुद्रांक घोटाळा प्रकरणातील (Stamp scam case) सर्व 7 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने हा निकाल दिला (Nashik District Court). जिल्हा न्यायधीश पी. आर. देशमुख, वर्ग १ यांच्याकडे या प्रकरणाची गेले काही महिने नियमित सुनावणी सुरू होती. अखेर या प्रकरणावर आज (31 डिसेंबर) अंतिम सुनावणी झाली. या वेळी सबळ पुरावा नसल्याचे कारण देत न्यायालयाने हा निर्णय दिला. स्टॅम्प घोटाळा या नावाने हे प्रकरण जोरदार गाजले होते. या प्रकरणात अनेक राजकिय नेत्यांचीही नावे होती. विद्यमान भाजप आमदार अनिल गोटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचेही नाव या प्रकरणात आले होते.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी (Abdul Karim Telgi)याचा यापूर्वीच मृत्यू झाला होता. त्यामुळे इतर आरोपींबाबत न्यायालय काय निर्णय देणार याकडे राजकीय वर्तुळ आणि राज्याचे लक्ष लागले होते. रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी या प्रकरणात प्रमुख आरोपी होते. त्यामुळे खटल्याबाबतची गुंतागुंत अधिकच वाढली होती. (हेही वाचा, ऑगस्टा वेस्टलॅंड: 'हड्डीवाला कुत्ता' कोण? ख्रिश्चन मिशेल याची डायरी सीबीआयच्या हाती)
या प्रकरणात एकूण 49 साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली. सुमारे 32 हजार कोटी रुपयांचा हा घोटाळा होता. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत होती. अखेर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी या प्रकरणात अंतिम निकाल दिला. ज्यात सर्व 7 आरोपी निर्दोश मुक्त झाले.