'कोरोना को भूल गए, राजकारण प्यारा है,' लहान मुलांचा फोटो शेअर करत आदित्य ठाकरे यांची भाजपवर टीका
लहान मुले सरकारचा निषेध करताना (PC - Twitter)

राज्यात कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातली आरोग्य व्यवस्था कोसळली आहे, असा आरोप करत भाजपने राज्य सरकार विरोधात आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनावर टीका करत राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी लहान मुलांचा फोटो शेअर करत भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. तसेच कोरोना विसरुन भाजपाला राजकारण प्रिय आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'हे पूर्णपणे लज्जास्पद आहे. सत्तेच्या राजकारणाची लालसा नेत्यांना काय करू शकते. या स्थितीमध्ये मुलांना घरात ठेवणं गरजेचं असताना त्यांना राजकीय निषेधासाठी चेहऱ्यावरील मास्क मास्क काढून उन्हात उभं करणं हे अत्यंत वाईट आहे. कोरोना को भूल गए, राजकारण प्यारा है,' असं आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. (हेही वाचा - महाराष्ट्र भाजप नेत्यांचे केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या सरकारविरोधात आंदोलन, शिवसेना खासदार संजय राऊत यांची 'मेरा आंगन मेरा रणांगन' वर टीका)

कोल्हापुरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी त्यांच्या घराबाहेर आंदोलन केलं. यावेळी त्यांनी 'मेरा आंगन, मेरा रणांगण' असा नारा दिला. तसेच राज्यासाठी 50 हजार कोटींच्या पॅकेजची मागणी केली. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतल्या भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. यावेळी भाजपचे नेते विनोद तावडे, मंगलप्रभात लोढा आणि इतर कार्यकर्ते काळे कपडे घालून उपस्थित होते. त्यांनी चेहऱ्यावर काळे मास्क आणि हातात पोस्टर दाखवून राज्य सरकार विरोधात 'महाराष्ट्र वचाव'च्या घोषणा दिल्या.

महाराष्ट्रात ८०% खाजगी रुग्णालयातील खाटा कोरोना रुग्णासाठी राखीव; बाकीच्या शस्त्रक्रियांमध्येही सवलत - Watch Video

राज्य सरकार कोरोना विषाणूचं संकट हाताळण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यासाठी फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदनही दिले. 'कोरोनामुळे जे संकट उभे ठाकले आहे, त्याचा सामना करण्यासाठी जी प्रभावी पावले टाकण्याची गरज होती, ती टाकलेली दिसत नाहीत. त्यामुळेच महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आणि मृतांची संख्या आहे आणि ही संख्या दररोज वाढते आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.