Coronavirus: नाशिक शहरात (Nashik City) 2 मे रोजी मृत्यू झालेल्या महिलेचा कोरोना रिपोर्ट पोझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नाशिक शहरातील हा कोरोनाचा पहिला बळी ठरला आहे. आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात कोरोनामुळे 13 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज सकाळी जिल्हा प्रशासनाला 80 संशयित रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. यातील 4 जणांना कोरोनाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, नाशिक शहरामध्ये बजरंग वाडी येथे राहत असलेली नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेला श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला शनिवारी सायंकाळी सरकारी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या महिलेमध्ये कोरोनाची लक्षणं असल्याने तिचा स्वॅब घेऊन तपासणी करण्यात आली. परंतु, केवळ दोन तासांतच तिचा मृत्यू झाला. (हेही वाचा - Coronavirus: पुण्यात आज 99 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2202 वर पोहोचली)
दरम्यान, आज या महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ही महिला मूळची उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. एक वर्षांपूर्वी ती आपल्या पतीसोबत नाशिकमध्ये वास्तव्यास होती. नाशिक जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत नाशिकमध्ये 382 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.