Representational Image (Photo Credits: Pixabay)

पूर्वी एक काळ होता जेव्हा सुनांचा सासुरवास व्हायचा, सासरची मंडळी विविध कारणांनी आपल्या सुनांचा छळ करायची. मात्र दुर्दैवाने आजही प्रगतशील महाराष्ट्रात या घटना घडल आहे. मागच्या आठवड्यात नागपूर (Nagpur) येथे सासरच्या छळाला कंटाळून एक विवाहीने आत्महत्या (Suicide) केली होती. आता या प्रकरणाचा छडा लावण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 'तू दिसायला सुंदर नाहीस, तू कुरूप आहेस' असे म्हणत सासरच्या मंडळीनी या विवाहितेचा छळ केला होता. हा त्रास असह्य झाल्याने या 26 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली.

रोशनी कुमरे असे या तरुणीचे नाव आहे. 9 महिन्यांपूर्वी रोशनीचे किशोरशी लग्न झाले. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच सासरच्या लोकांनी रोशनीचा छळ करायला सुरुवात केली. यामध्ये नवरा, सासू, नणंद असे सर्वजणच सामील होते. 'तू दिसायला सुंदर नाहीस, तू कुरूप आहेस. आम्ही तुला सोडून नवी मुलगी घेउन येणार', असे म्हणत हा छळ सुरु होता. या त्रासाला कंटाळून रोशनी माहेरी आली, मात्र त्यानंतर परत तिची समजूत घालून तिला परत पाठवले. (हेही वाचा: जगभरात दररोज किती लोक आत्महत्या करतात माहिती आहे?)

ती परत सासरी गेल्यावरही हा त्रास कमी झाला नाही. 10 फेब्रुवारीला किशोरने रोशनीला मारहाण केली. त्यानंतर रोशनीने आपल्या वडिलांना फोन केला. 'बाबा मला खूप त्रास होत आहे. छळ असह्य झाला आहे. आता मी जगणार नाही,' असे तिचे शेवटचे शब्द होते. वडिलांनी तिला फोनवर समजावले मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेर रोशनीने पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. त्यानंतर पोलीस तपासात सासरच्या मंडळीनी छळ केल्याचे उघडकीस आले. देवराव नारायणराव कंगाले यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. पती किशोर कुमरे, सासू लक्ष्मीबाई कुमरे, दोन बहिणी पूनम कुमरे व पुष्पा मसराम यांच्यावर हा गुन्हा दाखल केला गेला आहे.