Suicide In Sangli: इलेक्ट्रिक कटर मशीनने स्वतःचा गळा चिरून एका व्यक्तीची आत्महत्या; सांगली येथील घटना
प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

इलेक्ट्रिक कटर मशीनने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना सांगली (Sangli) जिल्ह्यातील माधवनगर कॉटन मिल परिसरात शनिवारी घडली आहे. याप्रकरणी संजयनगर पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. शहाजहान खान असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शहाजहान हे मिल चाळीत एकटेच राहत असून शनिवारी बराच उशीर झाला तरी ते खोलीतून बाहेर पडले नाहीत. यामुळे त्यांना पाहण्यासाठी आलेल्या शहाजहानच्या भावाने त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पाहिले. त्यानंतर शहाजहान यांना तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आले आहे. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

शहाजहान हे 40 वर्षीय असून त्यांचे चायनीज पदार्थांचे स्टॉलदेखील आहे. घरात एकटेच राहत असलेले शहाजहान बराच वेळ झाला तरी बाहेर न आल्याने त्यांना पाहण्यासाठी त्यांचा भाऊ आला होता. परंतु बाहेरून आवाज देऊन आतून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्याने शहाजहान यांच्या भावाने दरवाजा उघडून पाहिले. त्यावेळी शहाजहान हे रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर पडल्याचे दिसले. त्यांना तातडीने उपचारासाठी सांगलीतील वसंतदादा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशीला सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांना घटनास्थळी इलेक्ट्रिक कटर मशीन दिसली आहे. त्यामुळे मृतांनी कटर मशीच्या सहाय्याने आपला गळा चिरला आहे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हे देखील वाचा-औरंगाबाद: कोरोनाच्या भीतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस काकासाहेब कणसे यांची घाटी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

या घटनेने सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सध्या संजयनगर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून आत्महत्येमागचे नेमके कारण काय? याबाबत तपास केला जात आहे. तसेच ही आत्महत्या आहे की हत्या? याचाही शोध घेतला जात आहे.