
महाराष्ट्रात (Maharashtra) आलेल्या कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेने सर्वांनाच चिंतेत टाकले आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव अटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन लावला आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकारला यश आले आहे. परंतु, काही जिल्ह्यात अजूनही कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. याचपार्श्वभूमीवर सोलापूरात (Solapur) एका सामाजिक कार्यकर्त्याच्या अंत्यदर्शनासाठी समर्थकांनी तुफान गर्दी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 200 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, 45 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
सोलापुरातील लष्कर भागातील सामाजिक कार्यकर्ते करण म्हेत्रे यांच्या निधनानंतर अंत्यदर्शनसाठी ही गर्दी जमली होती. सध्या संपूर्ण महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट घोंगावत असताना हा प्रकार घडला आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन नियमांचा भंग केल्याप्रकरणी 200 हून अधिक जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. तर, 45 जणांना अटक करण्यात आली आहे. चिंताजनक बाब म्हणजे, अटक करण्यात आलेल्यांपैकी एकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून करण म्हेत्रे यांच्या सोलापुरातील घराचा एक किमीचा परिसर बॅरिकेट्स लावून सील केला आहे. या संदर्भात लोकसत्ताने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- Coronavirus: कोरोना महामारी, शेती आदी मुद्द्यांवरुन शरद पवार यांचे केंद्र सरकारला पत्र
महाराष्ट्रात काल (17 मे) 26 हजार 616 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 48 हजार 211 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण 48 लाख 74 हजार 582 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 4 लाख 45 हजार 495 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 90.19% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
याशिवाय, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात काल महाराष्ट्राने 2 कोटीचा टप्पा ओलांडला आहे. एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांना लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरले आहे. या कामगिरीबद्दल राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.