लग्न जुळत नाही म्हणून 80 फुट उंचीच्या क्रेनवर चढून तमाशा; पोलिसांची उडाली तारांबळ
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Maxpixel)

लग्न जुळत नाही म्हणून एका तरुणाने चक्क 80 फुट उंचीच्या क्रेनवर चढून तमाशा केल्याची घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणात तरुणाला कोणतीही शारीरिक इजा झाली नसली तरी, पोलिसांची तसेच अग्निशामक दलाची फार मोठी तारांबळ उडाली. क्रेनवर चढल्यानंतर आपण आत्महत्या करायला नाही तर, आपल्या मनातील भावना व्यक्त करायला वर चढलो आहोत असे या तरुणाने सांगितले. त्यामुळे त्याची मनधरणी करत त्याला खाली उतरवता उतरवता पोलिसांच्या अगदी नाकी नऊ आले होते.

पुण्यातील रावेतजवळ उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या कामासाठी असलेल्या क्रेनवर एक तरुण चढून 80 फुटांवर गेला. विचित्र हावभाव करत त्याने लोकांचे लक्ष वेधून घेण्यास सुरुवात केली. लोक जमा झाल्यानंतर तो आत्महत्या करण्यासाठी वर गेला असल्याचा समज झाला. त्यामुळे तत्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी जेव्हा त्याच्याशी संवाध साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा, आपले लग्न ठरत नसल्यामुळे आपल्याला नैराश्येने ग्रासले आहे. आत्महत्येसाठी नाही तर मनातील भावना व्यक्त करण्यासाठी उंचीवर गेलो होतो. माझे लग्न जुळवून द्यावे, एवढीच विनंती आहे, असे तो तरुण म्हणाला. शेवटी पोलिसांनी ‘लग्न लावून देतो’ असे आश्वासन दिल्यानंतर तो तरुण खाली उतरला.

दरम्यान 39 वर्षांचा हा गृहस्थ मुळचा मराठवाड्यातील असून, पिंपरी चिंचवड येथे आपल्या नातेवाईकांकडे राहायला आला आहे. हा गृहस्थ एचआयव्ही बाधित असल्याने त्याचे लग्न जुळत नाही. या कारणाने आलेल्या नैराश्येमधून त्याने हे पाऊल उचलले असल्याचे समजते.