अमरावती (Amravati) येथील एका दिव्यांग शेतकऱ्याने तहसिल कार्यालयातच विष (Poison) घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने तहसील कार्यालयात (Tehsil Office) बराच काळ गोंधळ उडाला होता. सतत हेलपाटे मारूनही मागणी पूर्ण होत नसल्याने या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या शेतकऱ्यावर जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन रामेश्वर वटाणे (वय, 40) असे विष प्राशन केलेल्या दिव्यांग शेतकऱ्याचे नाव आहे. सचिन हे चांदूरबार येथील रहिवासी आहेत. सचिन यांचा वहिवाटीचा रत्ता शेजारच्या शेतकऱ्याने बंद केला होता. तो रत्ता मोकळा करून देण्यासाठी ते तहसील कार्यालयात फेऱ्या मारत होते. परंतु, सतत हेलपाटे मारून महिना उलटून गेला. तरीही त्याच्या समस्येकडे सरकारी बाबू दुर्लक्ष करत होते. त्यामुळे हवालदिल झालेल्या सचिन वाटाणे या दिव्यांग शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. हे देखील वाचा- Online Fraud: मुंबईच्या अंधेरी येथील महिलेची मेट्रिमोनी साइटवरून फसवणूक; गुन्हा दाखल
सचिन यांनी विष घेतल्यानंतर त्यांना त्वरित तहसीलदारांच्या वाहनाने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत अद्यापही सुधारणा झाली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या संदर्भात लोकशाहीने वृत्त दिले आहे.
शेतकरी आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. आतातरी संबंधित शेतकऱ्यांची समस्या मार्गी लागणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.