पुण्यातील (Pune) कोरोनाबाधित महिलेने (Coronavirus Stricken Woman) कोरोनामुक्त बाळाला (Corona Free Baby) जन्म दिला आहे. बाळाची तब्बेत ठणठणीत असून पुणे महापालिकेच्या सोनावणे रुग्णालयात (Sonawane Hospital) या महिलेची प्रसूती करण्यात आली. यासंदर्भात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी माहिती दिली आहे. महापालिकेचे सोनावणे रुग्णालय हे कोरोनाबाधित गर्भवती महिलांसाठी खास राखून ठेवलेले रुग्णालय आहे. या रुग्णालयात गरोदर महिलांची विशेष काळजी घेतली जात आहे.
नवजात बाळाला कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी त्याला आईपासून दूर ठेवण्यात आलं आहे. सध्या रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स या बाळाची काळजी घेत आहेत. कोरोना बाधित महिलेची प्रसूती यशस्वी पार पाडल्याने सोनवणे रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारिका आणि राबणाऱ्या प्रत्येक घटकाचे मुरलीधर मोहोळ यांनी आभार मानले आहेत. (हेही वाचा - Maharashtra Police: गेल्या 24 तासांत 70 पोलिसांना COVID-19 ची लागण तर 2 जणांचा मृत्यू)
#GoodNews : कोरोनाबाधित महिलेने दिला कोरोनामुक्त बाळाला जन्म !
कोरोनाबाधित असलेल्या एका महिलेने कोरोनामुक्त बाळाला जन्म दिला आहे. बाळाची तब्बेत ठणठणीत असून आपल्या पुणे महापालिकेच्या सोनावणे रुग्णालयात संबंधित महिलेची प्रसूती करण्यात आली. pic.twitter.com/1qD64HsRlS
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) May 26, 2020
यापूर्वी पुण्यातील ससून रुगालयात एका कोरोनाग्रस्त महिलेने कोरोनामुक्त बाळाला जन्म दिला होता. आतापर्यंत पुणे शहरात अशा प्रकारच्या दोन घटना घडल्या आहेत. दरम्यान, सोमवारी कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालय परिसरातील सिंहगड हॉस्टेल कोविड केअर सेंटर येथे उपचार घेणारे 25 रुग्ण कोरोनामुक्त झाले. बरे होऊन घरी जाणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हे डॉक्टर्स आणि आरोग्यसेवकांच्या मेहनतीचे प्रतीक असल्याचं मोहोळ यांनी म्हटलं आहे.
पुणे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पुण्यात सोमवारी एकाच दिवसांत जिल्ह्यात तब्बल 459 नवीन रुग्णांची भर पडली. तसेच 8 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 6 हजार 153 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत 280 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.