अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) पाथर्डी (Pathardi) तालुक्यामधील भारजवाडी (Bharajwadi) येथे हृदयद्रावक घटना घडीली आहे. इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या एका मुलाने 'बळीराजा नको करु आत्महत्या', अशा आशयाची एक कविता (Poem) आपल्या शाळेत सादर केली. परंतु, दुर्दैवाची बाब म्हणजे त्याच रात्री या मुलाच्या शेतकरी वडिलांनी विष प्राशन करून आत्महत्या (Father Commits Suicide) केली.
प्रशांत बटुळे, (Prashant Batule) असं या तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव आहे. प्रशांत पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी या ठिकाणी हनुमाननगर येथे तिसरीच्या वर्गात शिकतो. प्रशांतने बुधवारी म्हणजेट 26 फेब्रुवारी रोजी आपल्या शाळेत 'अरे बळीराजा नको करु आत्महत्या' ही कविता सादर केली होती. शेतकऱ्याने आत्महत्या करु नये, यासाठी त्याने ही कविता रचली होती. परंतु, त्याच रात्री त्याचे वडील मल्हारी बाबासाहेब बटुळे यांनी विष प्राशन करुन आपल जीवन संपवलं. (हेही वाचा - अहमदनगर: माचिस बॉक्स वाहून नेणाऱ्या ट्रकला भीषण आग)
मल्हारी बटुळे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. त्यांनी ट्रॅक्टर आणि शेतीसाठी बँकेतून कर्ज घेतले होते. मात्र अवकाळी पावसामुळे त्याच्या शेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. या घटनेमुळे पार्थर्डी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच मल्हारी बटुळे यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
प्रशांतने सादर केलेल्या कवितेतील काही ओळी -
शेतात कष्ट करुनही तुझ्या डोक्याला ताप,
बळीराजा नको करु आत्महत्या..
पैसे नसूनही शाळेत शिकवता लेकरे,
कसे उन्हात करतात शेती,
पिक उगवणी करुन मिळतात पैसे
शेती करुनही तुझ्या हाताला फोड
अरे बळीराजा नको करु आत्महत्या
प्रशांतने मराठी मातृभाषा दिनानिमित्त भारजवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत काव्यवाचन स्पर्धेत ही कविता सादर केली होती. ही कविता स्वत: प्रशांतने लिहिली होती. कदाचित त्याला आपल्या वडीलांची कर्जबाजारीपणामुळे होणारी घुसमट समजली असावी. प्रशांतने शेतकऱ्यांना या कवितेच्या माध्यमातून आत्महत्या न करण्याचा सल्ला दिला. मात्र, त्याच रात्री त्याच्या शेतकरी वडीलांनी विष प्राशन करुन आपलं जीवन संपवलं. या घटनेमुळे संपूर्ण भारजवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.