अहमदनगर: माचिस बॉक्स वाहून नेणाऱ्या ट्रकला भीषण आग
Image For Representation (PC - PTI/pxhere)

अहमदनगर (Ahmadnagar) जिल्ह्यात काडीपेटीचा (Matchbox ) म्हणजेच माचिस बॉक्स वाहून नेणाऱ्या ट्रकला (Truck) भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. काडीपेटी वाहून नेणारा भरधाव ट्रक कंटेनरला घासून गेल्यामुळे ट्रकमधील माचिस बॉक्सने पेट घेतला. त्यामुळे ट्रकला भीषण आग लागली. यात ट्रकमधील सर्व माल जळून खाक झाला आहे. सुदैवाने ट्रकचा चालक आणि क्लीनरने ट्रकमधून उडी घेऊन आपले प्राण वाचवले.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले होते. दरम्यान, सकाळी सात वाजताच्या सुमारास सोलापूर महामार्गावरील वाळूंज चौकातून हा ट्रक मनमाडकडे बायपासवरून जात होता. त्यावेळी अरणगावजवळ सोलापूरकडे जात असलेल्या कंटेनरचा भाग भरधाव ट्रकला घासला. त्यामुळे ट्रकमधील काडीपेट्यांनी पेट घेतला. प्रसंगावधान राखत ट्रक चालक आणि क्लीनर यांनी ट्रकमधून उडी मारली. या घटनेत ट्रक संपूर्ण जळून खाक झाला आहे.  (हेही वाचा - कौतुकास्पद! मराठमोळ्या मेजर जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची भारतीय लष्करात लेफ्टनंट जनरल पदावर बढती)

दरम्यान, ट्रकला लागलेली आगीमुळे मनमाड बायपास जवळील वाहतूक बऱ्याच काळासाठी थांबली होती. ही आग विझवण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. मात्र, अग्निशमन दलाला घटनास्थळी येऊपर्यंत ट्रक जळून खाक झाला होता. त्यानंतर आग कमी झाल्यानंतर मनमाड बायपाय रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली.

या घटनेची माहिती मिळताच अहमदनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने जळालेला ट्रक रस्त्यावरून हटवून वाहतूक सुरळीत केली. या घटनेत काडीपेटी मालकाचे मोठे नुकसान झाले असून ट्रकही जळून खाक झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.