लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर आणि त्यांचे पती (PC - ANI)

मेजर जनरल डॉ. माधुरी कानिटकर (Major General Dr Madhuri Kanitkar) यांना शनिवारी लेफ्टनंट जनरल (Lieutenant General) पदावर बढती देण्यात आली. त्यांनी आज लेफ्टनंट जनरल पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. लेफ्टनंट जनरल पदापर्यंत पोहोचणाऱ्या माधुरी कानिटकर या तिसऱ्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. विशेष म्हणजे या उच्च पदावर पोहोचलेल्या त्या पहिल्याचं मराठी महिला अधिकारी आहेत.

नवी दिल्ली येथील एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (सीडीएस- वैद्यकीय) म्हणून कानिटकर यांनी सूत्रे हाती घेतली आहेत. दिल्लीतील संरक्षण विभागाने माधुरी कानिटकर यांच्या पदोन्नतीला शुक्रवारी मंजुरी दिली होती. जनरल (लष्कर प्रमुख) नंतर लेफ्टनंट जनरल हे भारतीय लष्करातील दुसरं सर्वोच्च पद आहे. या पदावर माधुरी कानिटकर यांची निवड झाल्याने महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.  (हेही वाचा - दिल्लीच्या पोलिस आयुक्त पदी एस. एन. श्रीवास्तव यांची नियुक्ती; 1 मार्चपासून स्वीकारणार पदभार)

डॉ. माधुरी कानिटकर या गेल्या 37 वर्षांररपासून भारतीय लष्कराच्या सेवेत कार्यरत आहेत. तसेच त्यांचे पती राजीव हे लष्करातून लेफ्टनंट जनरल पदावरून निवृत्त झाले आहेत. माधुरी कानिटकर यांची गेल्या वर्षी लेफ्टनंट जनरल पदासाठी निवड झाली होती. मात्र, हे पद रिक्त नसल्याने त्यांनी या पदाची सूत्रे हाती घेतली नव्हती. परंतु, आज हे पद रिक्त झाल्यामुळे त्यांनी लेफ्टनंट जनरल पदाची सूत्रे हाती घेतली आहेत.

यापूर्वी भारतीय नौदलात डॉ. पुनीता अरोरा यांनी पहिल्यांदा व्हाइस अॅडमिरल पद भूषविले होते. तसेच पद्मावती बंडोपाध्याय या हवाई दलात दुसऱ्या महिला ठरल्या होत्या. त्यांनी एअर मार्शल पदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर आता भारतीय लष्करात डॉ. माधुरी कानिटकर यांनी लेफ्टनंट जनरल पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. कानिटकर यांची लेफ्टनंट जनरल पदी निवड होणं ही महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.