IPS officer SN Shrivastava appointed Delhi Police Commissioner (PC - ANI)

दिल्लीच्या पोलिस आयुक्त पदी (Delhi Police Commissioner) एस. एन. श्रीवास्तव (SN Shrivastava) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीवास्तव हे 1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी (IPS Officer) आहेत. 31 जानेवारीला पोलिस आयुक्त अमूल्य पटनायक यांचा कार्यकाल संपला होता. मात्र, त्यांचा कार्यकाल वाढवण्यात आला होता. सध्या दिल्लीमध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे श्रीवास्तव यांची पोलिस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने शहरातील हिंसाचार आणि दंगलीवरून पोलिसांनी परिस्थिती योग्यरित्या हाताळली नसल्याचे म्हटले होते. तसेच राजकीय नेत्यांनीही या प्रकरणावरून पोलिसांवर टीकास्त्र डागले होते. त्यामुळे दिल्लीचे पोलिस आयुक्त बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, एस. एन. श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली. (हेही वाचा - दिल्ली हिंसाचार: केजरीवाल सरकार मृतांच्या परिवाराला 10 लाख रुपये तर जखमींना मोफत उपचार देणार)

एस. एन. श्रीवास्तव यांनी या अगोदर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. श्रीवास्तव यांनी यापूर्वी दिल्ली पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेचे प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. तसेच ते सीआरपीएफच्या पश्चिम परिमंडळाचे एडीजी होते. त्यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये 'ऑपरेशन ऑलआऊट' मोहिम राबवली होती. श्रीवास्तव शनिवारी म्हणजेच उद्या दिल्ली पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार आहे. श्रीवास्तव हे 30 जून 2021 पर्यंत दिल्ली पोलिस आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.