
Thane: भिवंडी महसूल कार्यालयात नायब तहसीलदार (Nayab Tehsildar) म्हणून कार्यरत असलेल्या सिंधू खाडे (Sindhu Khade) या 52 वर्षीय महिलेला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी अटक केली. फेरफार आक्षेप नोंदविण्याचा अंतिम अहवाल देण्याच्या बदल्यात त्यांनी मागितलेल्या 1.50 लाख रुपयांच्या लाचेचा (Bribe) पहिला हप्ता म्हणून 50,000 रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली त्यांना पकडण्यात आले.
एसीबीचे ठाणे अधीक्षक सुनील लोखंडे यांनी या प्रकरणाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, तक्रारदार हा वकील आहे. सिंधूच्या अखत्यारीत असलेल्या त्यांच्या फेरफारावर आक्षेप नोंदवण्यासंबंधीचे प्रकरण प्रलंबित होते. अंतिम अहवाल देण्यासाठी सिंधूने तक्रारदाराकडून दीड लाख रुपयांची लाच मागितली. (हेही वाचा - Parbhani: शेळ्या चोरल्याचा संशय, जमावाकडून बेदम मारहाणीत अल्पवयीन मुलाचा मृत्यू; परभणी येथील घटना)
तक्रारदाराने गुरुवारी ठाणे एसीबीकडे तक्रार दाखल केली आणि पोलिस निरीक्षक सुरेश चोपडे यांच्या नेतृत्वाखालील आमच्या पथकाने तक्रारीची पडताळणी करून सिंधूच्या लाचेच्या मागणीची पुष्टी केली. अधिकाऱ्याने पुढे सांगितले, तक्रारदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे गुरुवारी सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून लाचेचा पहिला हप्ता म्हणून 50,000 रुपये स्वीकारताना सिंधूला रंगेहात अटक करण्यात आली.
लोखंडे यांनी सांगितले की, शांतीनगर पोलिस ठाण्यात सिंधू खाडे यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहोत.