चिंताजनक! पुण्यातील आत्महत्या थांबेना; केईएम रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारल्याने एका 36 वर्षीय महिलेचा मृत्यू
Representational Image | (Photo Credits: ANI)

पुण्यात (Pune) मागील काही दिवसांपासून आत्महत्येच्या घटनांचे सत्र सुरूच असल्याचे दिसत आहे. यातच आणखी एका महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित महिलेने पुण्यातील केईएम (KEM Hospital) रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन (Suicide) संपवले आहे. या घटनेची माहिती मिळताच समर्थ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या महिलेचा मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आला आहे. नैराश्यातून या महिलेने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली असून स्थानिक पोलिस अधिक चौकशी करत आहेत. या आत्महत्या घटनेने संपूर्ण पुणे जिल्ह्यात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासना मुकेश बकसानी असे या आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. पुण्यातील केईएम रुग्णालयामध्ये 13 वर्षांच्या तिच्या मुलावर उपचार सुरू होते. त्याला डायबेटिस आणि किडनीचा त्रास होता. त्यामुळे त्याच्यावर पुण्यातील केईएम रुग्णालयामध्ये कित्येक दिवसांपासून उपचार सुरू होते. तीन महिन्यांपूर्वी कॅन्सरमुळे मृत महिलेच्या पती मुकेश बकसाना याचे निधन झाले होते. सतत येणाऱ्या संकटांमुळे परिस्थितीसमोर हताश झालेल्या यासना यांनी हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावरील खिडकीतून उडी मारून आत्महत्या केली, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस कर्मचारी करत आहेत. हे देखील वाचा- धक्कादायक: पतीने आत्महत्या केल्याची पाहून पत्नीनेही त्याच हुकाला गळफास लावून संपवले स्वत:चे जीवन; पुणे येथील घटना

पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहेत. तर, दुसरीकडे आत्महत्येच्या घटेनेतही वाढ होऊ लागली आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांत अनेकांनी गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. ज्यामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.