Mumbai: लोकल ट्रेनमध्ये प्रवाश्याला ठार मारल्याप्रकरणी 23 वर्षीय व्यक्तीला अटक; रेल्वे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अटक, प्रतिकात्मक फोटो (File Photo)

Mumbai: दोन दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे लोकल ट्रेनमधून एका प्रवाशाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला होता. अखेर या प्रवाशाची हत्या करणाऱ्या आरोपीचा शोध लागला आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने एका 23 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. मोहम्मद असिफ शेख असं या आरोपीचं नाव आहे. तसेच मृत व्यक्तीच्या मोबाईल फोनसह सर्व वस्तू गहाळ आहेत. त्यामुळे आरोपीने प्रवाशाला लुटण्याच्या उद्देशाने संबंधित व्यक्तीचा खून केला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सोमवारी रात्री 10.45 वाजता सीएसएमटी येथील सामानाच्या डब्यातून अज्ञात प्रवाशाचा मृतदेह सापडला होता. यावेळी लोकल ट्रेन पनवेलहून आली होती. त्यावेळी ही घटना उघडकीस आली. हत्या करण्यात आलेला प्रवाशी सुमारे 25 वर्षांचा होता. या प्रवाशावर अनेक वेळा वार करण्यात आले होते. पोलिसांना या व्यक्तीकडून कोणतीही वस्तू किंवा ओळख पुरावा सापडला नाही. त्यानंतर सीएसएमटी जीआरपीने हत्येचा गुन्हा दाखल करून या घटनेचा तपास सुरू केला. (वाचा - Mumbai: लोखंडी रॉडने वार करत सुरक्षा रक्षकांकडून अल्पवयीन मुलाची हत्या; आरोपींना अटक)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गोवंडीहून ट्रेनमध्ये चढला होता, तर मृतक कुर्ला स्थानकातून ट्रेनमध्ये चढला होता. आरोपीला जीटीबी नगर स्थानकात सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद करण्यात आले होते. एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक शैलेंद्र धीवार यांनी सांगितलं की, आम्ही सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेतला. त्यानंतर आम्ही गुरुवारी आरोपीला अटक केली.

चौकशीदरम्यान संशयीत आरोपी शेख याने असा दावा केला की, घटनेच्या वेळी कुर्ला ते जीटीबी नगर स्टेशन दरम्यानच्या ते दोघे डब्यात एकटे होते. मृताने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी त्याने प्रवाशावर हल्ला केला. यात त्याचा मृत्यू झाला. मात्र, शेख यांनी केलेल्या दाव्यावर पोलिसांना शंका आहे.

मृत व्यक्तीचा मृतदेह सापडला त्यावेळी त्याचा मोबाईल आणि पॉकेट दोन्हीही गायब होते. पोलिसांना असा संशय आहे की, शेखने दरोड्याच्या उद्देशाने त्याचा खून केला असावा. शुक्रवारी शेख यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.