आजचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे. याचा प्रत्यय आपल्याला लहान मुलांकडे असलेली तंत्रज्ञानासंबंधित माहिती, अपडेट्स यावरुन येतो. वयाने लहान मुलं अगदी सहज, सफाईदारपणे मोबाईल, कम्प्युटर हाताळतात. त्यांना पाहिलं की आपल्यालाच कौतुक वाटतं. अशीच एकच कौतुकास्पद कामगिरी मुंबईतील अवघ्या नऊ वर्षांच्या मुलाने केली आहे.
व्योम बग्रेचा असे या मुलाचे नाव असून त्याला सॉफ्टवेयर कोडिंग करणे खूप आवडते. याच छंदापायी त्याने इतक्या लहान वयात हेल्थ अॅप बनवण्याची कामगिरी केली आहे. हे हेल्थ अॅप गुगल स्टोअरवर उपलब्ध असून तुम्ही ते डाऊनलोडही करु शकता. व्योमने बनवलेल्या हेल्थ अॅपमध्ये दिवसभरात किती ग्लास पाणी प्यावे, बेसिक हेल्थ टिप्ससह अनेक फिचर्स आहेत.
व्योम हा मुंबईतील नाहर इंटरनॅशनल स्कूल मध्ये इयत्ता चौथीत शिकतो. हेल्थ अॅप बनवल्यानंतर आता तो पार्किंग संबंधित एक अॅप बनवण्याचे काम करत आहे. इतकंच नाही तर मोठे होऊन पर्यावरणाचे संरक्षण करणारा रोबोट बनवण्याचे त्याचे स्वप्न असून त्यासाठी तो कोडिंग करणार आहे.
पण इतक्या लहान वयात व्योमला हा छंद कसा जडला? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर यात त्याच्या आईचे योगदान आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण त्याच्या आईने त्याला व्हाईट हॅट ज्युनिअर या एका ऑनलाईन कोडिंग प्रोग्रॅममध्ये घातले होते. व्हाईट हॅट ज्युनिअर हा एक कोडिंग प्लॅटफॉर्म असून तो खास लहान मुलांसाठी बनवण्यात आला आहे. व्हाईट हॅट ज्युनिअर या प्लॅटफॉर्मअंतर्गत अनेक लहान मुलांनी अॅप्स बनवले असून येथे गेम डेव्हलअपमेंट देखील शिकवले जाते.