Coronavirus: धुळे (Dhule) जिल्ह्यात आज आणखी 9 जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे तपासणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे. यातील 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच उर्वरित 7 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात नेहरू नगर मधील 3, जिल्हा कारागृहातील 3, इंद्रप्रस्थनगरातील 1 रुग्णांचा समावेश आहे.
धुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीत रूग्णांची संख्या 79 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज जिल्ह्यातील 10 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 31 मे पर्यंत लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. लॉकडाऊनचा काळावधी वाढवल्याने मुंबई-पुण्यातील नागरिकांनी गावाकडची वाट धरली आहे. यातील अनेकजणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. (हेही वाचा -पालघर: डहाणू मधील 39 वर्षीय परिचारिकेला कोरोना व्हायरसची लागण)
जळगाव जिल्ह्यात आज तेवीस कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 45 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहेत. यापैकी 22 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून तेवीस व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
धुळे शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने महापालिकेने आज शहरातील आणखी दोन भाग कंटेन्मेंट झोन (सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या 28 झाली आहे. दरम्यान, राज्यात मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, धुळे, सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 35 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. तर देशात 1 लाखापेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.