High Tide In Mumbai on 8th July 2019: मुंबईत पुन्हा पावसाचा जोर वाढला, दुपारी 4.18 च्या सुमारास समुद्रात उसळणार 4.37 मीटरच्या लाटा
High Tide (Photo Credits: Facebook)

मुंबईत आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे, परिणामी अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या (Water Logging) घटना सुद्धा सातत्याने समोर येत आहेत, अशातच समुद्रातील भरतीमुळे मुंबईकरांची चिंता आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज म्हणजेच 8 जुलै रोजी दुपारी 4:18च्या सुमारास अरबी समुद्रात साधारण 14.34 फूट (4.37 मीटर) लांबीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे समुद्राजवळील परिसरात सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले असून नागरिकांना सुद्धा खबरदारी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

LIVE Maharashtra Monsoon Live Updates: मुंबईमधील दमदार पावसानंतर अंधेरी सब वे मध्ये साचलं पाणी

आज, सकाळपासून पावसाचा जोर वाढला असून यामुळे वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे, मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलच्या मध्य, पश्चिम व हार्बर तीन ही मार्गांवरील वाहतूक उशिराने धावत आहे,त्यामुळे ऐन सोमवारी चाकरमानी मंडळींना ऑफिस गाठण्यात उशीर होत आहे. याशिवाय अंधेरी, बांद्रा, किंग्स सर्कल, सायन परिसरात पाणी साचल्याने रस्ता वाहतुकीचा वेगही मंदावला आहे.

काही दिवसांपूर्वी, बीएमसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, जुलै ते सप्टेंबर दरम्यान समुद्रात एकूण 23 वेळा 4.6 मीटरहुन अधिक उंचीच्या लाट उसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्यामध्ये ऑगस्ट मध्ये 3 तारखेला आणि सप्टेंबरमध्ये 1 तारखेला मोठी भरती येणार असल्याचे सांगण्यात आले आहे