जळगाव ला जाणाऱ्या महामार्गावर भीषण अपघात; ट्रक आणि ओमनीची धडक झाल्याने 8 जणांचा मृत्यू
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Road Accident In Jalgaon: जळगावमध्ये ऐरंडोल तालुक्यातील पिंपळकोठाजवळील महामार्गावर आज एक भीषण अपघात घडला आहे. महामार्गावर आयशर ट्रक आणि ओमनी यांची समोरासमोर धडक झाली असून या अपघातात तब्बल 8 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. परंतु, लगेचच घटना स्थळी पोलीस दाखल झाले असून जखमींना वाचवण्यासाठी बचावकार्य सध्या सुरू आहे.

तब्बल 12 ते 13 प्रवासी ओमनीने ऐरंडोलवरून जळगावच्या दिशेने जात होते. परंतु, अचानक त्याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रकच्या स्टेरिंगचा एक्सल तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटलं आणि या ट्रकची समोरून येणाऱ्या ओमनीशी धडक झाली. ट्रक क्रमांक एमएच 15 जी. 8474 धुळ्याहून जळगावच्या दिशेने जात होता व ओमनी क्रमांक एमएच 19 वाय. 5207 वर आदळला.

घडलेला अपघात इतका भीषण होता की ओमनी चालकाचा व काही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर काही जखमींना ऐरंडोलच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अपघातामध्ये एकूण 8 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

आता अपघातामध्ये मृत्यू झालेल्या प्रवाशांची ओळख पटवण्याचं काम सध्या पोलीस करत आहेत. मुख्य म्हणजे मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे.

परळी रेल्वे स्टेशनवर पूर्णा- हैद्राबाद पॅसेंजर गाडीमध्ये स्फोट, एक प्रवासी गंभीर जखमी

दरम्यान, पिंपळकोठाजवळील महामार्गावर असणाऱ्या हॉटेल प्रियंकाजवळ आज दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे.