ऊसतोड कामगार घेऊन जाणाऱ्या पिकअप व्हॅनला धुळ्यामध्ये भीषण अपघात; 7 जणांचा मृत्यू, 24 जण जखमी
Accident in Dhule (PC- ANI)

धुळ्यामध्ये मध्य प्रदेशातील ऊसतोड मजूर घेऊन येणाऱ्या पिकअप व्हॅनला झालेल्या भीषण अपघातात (Accident in Dhule) 7 मजूर ठार झाले आहेत. या अपघातात 24 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 2 महिला आणि 5 मुलांचा सहभाग आहे. या पिकअप व्हॅनमध्ये एकूण 31 कामगार होते. उस्मानाबादला जात असताना हा भीषण अपघात झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (हेही वाचा - मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात; टँकर आणि Swift च्या धडकेत 4 जण ठार)

धुळे तालुक्यातील बोरी नदीच्या पुलावर मध्यरात्रीनंतर हा भीषण अपघात झाला. वाहन चालकाला पुल अरुंद असल्याचा अंदाज न आल्याने त्याचा पिकअपवरील ताबा सुटला. त्यामुळे पिकअप पुलावरून थेट नदीपात्रात कोसळला. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पिकअप नदीपात्रात कोसळल्याने अपघातग्रस्तांना वाचवणे कठीण होते. मात्र, काही स्थानिक नागरिकांनी जीवाची पर्वा न करता 20 ते 25 जणांना नदीपात्रातून बाहेर काढले. तसेच जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

धुळे-सोलापूर महामार्ग नेहमी अपघात होत असतात. या महामार्गावर खड्ड्यांचे प्रमाण जास्त आहे. राज्यात महामार्गावरील अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे प्रवाशांना आपला जीव गमवावा लागत आहे.