मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात; टँकर आणि Swift च्या धडकेत 4 जण ठार
Accident | File Image

आज (29, नोव्हेंबर) सकाळी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे (Mumbai-Pune Express Way) वर भीषण अपघात झाल्याचे समोर येत आहे. टँकर आणि स्विफ्ट कारची (Swift Car) धडक झाल्याने हा अपघात झाला असून यामध्ये चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याशिवाय अपघातात दोघे गंभीर जखमी झाल्याचे देखील समजतेय. मुंबईवरील लेनवर रसायनी पोलीस ठाण्याच्या (Rasayani Police Station)  हद्दीत हा भीषण अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. तसेच स्थानिकांच्या मदतीने दोन्ही जखमी रुग्णांना कामोठेच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, मागील दोन वर्षांमध्ये मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai-Pune Expressway) झालेल्या अपघातांमध्ये 106 जणांचा मृत्यू झाला आहे. हे अपघात एक्स्प्रेस वेवर केल्या जाणाऱ्या पार्किंगमुळे झाले आहेत. पार्किंग केलेल्या वाहनांना पाठीमागून आलेल्या वाहनांची धडक दिल्याचे कारण या अपघातातून समोर आले आहे असे ‘सेव्ह लाईफ फाऊंडेशन’ने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रात्री उशिरा मुंबई पुणे एक्सप्रेसवे (Mumbai- Pune Expressway) वर व्होल्वो बसच्या भीषण अपघातात संचेती हॉस्पिटलचे (Sancheti Hospital) डॉ. केतन खुर्जेकर (Dr. Ketan Khurjekar) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, त्यानंतर काही दिवस हा रस्ते सुरक्षा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता.रस्ते अपघात रोखण्यासाठी वाहनांच्या वेगमर्यादेवर 100 किमी प्रतितास असे बंधन लगवण्यात आले आहे, मात्र अद्याप भरधाव वाहनांची उदाहरणे कमी झालेली नाही आजच्या या अपघाताने पुन्हा एकदा हे प्रकर्षाने समोर आले आहे.