कल्याण: 6 महिन्याच्या बाळाने केली कोरोनावर मात; सोसायटीतील नागरिकांनी केलेलं स्वागत पाहून येईल डोळ्यात पाणी, पाहा व्हिडिओ
कल्याण: 6 महिन्याच्या बाळाने केली कोरोनावर मात (PC - Twitter)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना बाधित (Coronavirus) रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात मुंबई शहरातील उपनगरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, अशातचं कल्याण (Kalyan) येथील एका 6 महिन्यांच्या बाळाने कोरोनावर मात केली आहे. या बाळावर उपचार करून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. हे बाळ घरी आल्यानंतर मनसे नगरसेविका कस्तुरी देसाई तसेच सोसायटीतील नागरिकांनी त्यांचं स्वागत केलं आहे. या सर्वांनी टाळ्या, थाळ्या आणि शिट्या वाजवत स्वागत केलं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान, कोरोनावर मात केलेल्या बाळाच्या आईने सर्वांचे आभार मानले आहेत. याप्रसंग्गी उपस्थित नागरिकांनी नगरसेविका कस्तुरी देसाई, पोलिस, डॉक्टर आणि रुग्णावाहिका चालक यांचे आभार मानत टाळ्या वाजवल्या. तसेच बाळाच्या पुढील तपासणीसाठी डॉक्टरांना पाठवले जाईल, असं कस्तुरी देसाई यांनी यावेळी सांगितलं. (हेही वाचा - तेलंगणामध्ये 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन ; 11 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)

कल्याण-डोंबिवलीमध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीला कोरोना हॉटस्पॉट जाहीर करावे, अशी मागणी तेथील स्थानिक आमदारांनी सरकारकडे केली आहे. दरम्यान, आज महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा 1761 वर पोहोचला आहे. राज्यात आज 187 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.