जालना जिल्ह्यात आज 56 नवे कोरोनाबाधित रुग्ण; कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजपासून पुढील 10 दिवस कडक संचारबंदी लागू
Jalna Curfew (PC - Twitter)

राज्यात कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामीण भागांपेक्षा शहरी भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. जालना (Jalna) जिल्ह्यात आज 56 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 775 इतकी झाली आहे.

जालना जिल्ह्यात कोरोना विषाणू वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आजपासून पुढील दहा दिवस कडक संचारबंदी (Curfew) लागू केली आहे. दरम्यान, रविवारी जालन्यातील 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला, तर दिवसभरात 47 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. (हेही वाचा -औरंगाबाद मध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर, 10 ते 18 जुलैपर्यंत कडक निर्बंध लागू होणार)

जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी पुढील दहा दिवस संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या अंमलबजावणीस रविवारी मध्यरात्रीपासून सुरुवात करण्यात आली आहे. दिवसागणिक वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, रविवारी राज्यात तब्बल 6 हजार 555 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, 125 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 6 हजार 619 वर पोहचली आहे. यापैकी 8 हजार 822 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत 1 लाख 11 हजार 740 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.