औरंगाबाद मध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर, 10 ते 18 जुलैपर्यंत कडक निर्बंध लागू होणार
Lockdown (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत होणारी वाढ पाहत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन (Lockdown) वाढविण्यात आला आहे. राज्यात 'मिशन बिगीन अगेन' (Mission Begin Again) सुरु असताना काही जिल्हाय्त कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढ होत असल्याने लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. भिवंडी, अंबरनाथ, ठाणे, मीरा भाईंदर, रत्नागिरी, नवी मुंबई यांच्यासह अनेक ठिकाणी लॉकडाउन जाहीर झालेला असताना आता औरंगाबादमध्येही (Aurangabad) लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. औरंगाबाद शहर आणि वाळुंज परिसरात हा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. 10 ते 18 जुलैदरम्यान कडक निर्बंध लागू असणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी लोकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत 6568 रुग्ण आढळले असून 294 रुग्ण दगावले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. त्याचबरोबर 2788 रुग्ण बरे झाल्याचेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात मुंबई, पुणे, रत्नागिरीसह अन्य जिल्ह्यात किती आहेत कोरोनाचे रुग्ण, जाणून घ्या आजची जिल्हानिहाय आकडेवारी

तर महाराष्ट्राचा एकूण विचार केला असता काल (5 जुलै) दिवसभरात 6 हजार 555 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 125 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या 2 लाख 6 हजार 619 वर पोहचली आहे. यापैकी 8 हजार 822 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 11 हजार 740 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणूला आटोक्यात आणण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र या सोबत नागरिकांनी सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.