धक्कादायक! पुण्यात 55 वर्षाच्या कोविड रुग्णाची गळफास लावून आत्महत्या
प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

पुण्यात (Pune) एका 55 वर्षाच्या कोविड रुग्णाने गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. मृत रुग्णाने मृत्यूपूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवलेली नसून अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलिसांनी माहिती दिली आहे.

पुणे शहरामधील कोंढाव्या परिसरातील सिंहगड इन्स्टिट्यूट येथील सेंटरमध्ये ही घटना घडली. या रुग्णांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. गुंडाप्पा शेवरे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. (हेही वाचा -Coronavirus Cases In Maharashtra: गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 5368 नवे कोरोना बाधीत रुग्ण, तर 204 जणांचा मृत्यू)

प्राप्त माहितीनुसार, गुंडाप्पा शेवरे आणि त्यांच्या मुलाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे त्यांना उपचारांसाठी कोंढव्यातील सिंहगड इन्स्टिट्यूट येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. या दोघांवर 4 जुलैपासून उपचार सुरू होते. या दोघांना ठेवलेल्या खोलीमध्ये आणखी दोन रुग्णांना ठेवण्यात आलं होतं.

दरम्यान, सोमवारी सकाळी खोलीतील सर्व कोरोना रुग्ण नाश्ता करण्यासाठी खोलीमधून बाहेर पडले. नाश्ता करण्यासाठी तळ मजल्यावर जायचे असल्याने शेवरे यांचा मुलगा व अन्य दोघे असे एकूण तिघेजण बाहेर पडले. परंतु, गुंडाप्पा शेवरे नाश्ता करण्यासाठी गेले नाहीत. मात्र, सर्वजण नाश्ता करून खोलीमध्ये आले तेव्हा त्यांना गुंडाप्पा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. या घटनेची माहिती मिळताचं पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिस या घटनेची अधिक तपास करत आहेत.