Coronavirus:औरंगाबाद जिल्ह्यात आज 51 नव्या कोरोना रुग्णांची भर, तर घाटी रुग्णालयात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू
Ghati Hospital and Coronavirus (PC- Twitter)

Coronavirus: औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad District) आज 51 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसेच शहरातील शासकीय घाटी रुग्णालयात (Ghati Hospital) एका कोरोनाबाधिताचा मृत्यू (Death) झाला आहे. औरंगाबाद शहरातला हा कोरोना विषाणू संसर्गाचा 35 वा बळी आहे. आज सकाळी औरंगाबाद जिल्ह्यात 51 नवीन रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 हजार 73 वर पोहोचली आहे. शहरात दररोज वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत आहे. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यात सोमवारी 2 हजार 33 नव्या रुग्णांची भर पडली. तर, 51 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 35 हजार 58 वर पोहोचली आहे. आतापर्यंत राज्यात 1 हजार 249 रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तसेच 8 हजार 437 जणांनी कोरोनावर मात केली आहे. (हेही वाचा - Maharashtra Lockdown 4 Guidelines: सार्वजनिक, खासगी वाहने Green And Orange Zones मध्ये सुरु, पाहा Containment Zones आणि इतर ठिकाणी काय सुरु काय बंद)

दरम्यान, देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येने एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे. मागील 24 तासात 4 हजार 970 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली असून 134 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1 लाख 1 हजार 139 झाली आहे. तसेच आतापर्यंत 3 हजार 163 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तसेच 39 हजार 174 जणांनी कोरोनावर मात केली आहे.