देशात कोरोना विषाणूच्या (Coronavirus) दुसर्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. दररोज 3 लाखाहून अधिक कोरोना रूग्णांचा आकडा समोर येत आहे. या साथीला सामोरे जाण्यासाठी सरकारकडून सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र कोरोना विषाणूचा नाश करण्यासाठी अजूनतरी ठोस किंवा अचूक औषध सापडले नाही. सध्या कोरोना लसीद्वारे लोकांना या आजारापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या लढाईमध्ये रुग्णांसाठी रेमडिसिव्हिर इंजेक्शनही लाभदायक ठरत आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रातील अहमदनगर येथील डॉ. अरुण भिसे यांनी दारू पाजून कोरोना रूग्णांना बरे केले असल्याचा विचित्र दावा केला आहे. लेटेस्टली मराठी अशा कोणत्याही दाव्याचे समर्थन करत नाही.
डॉक्टर अरुण भिसे यांच्या मते, एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर प्रथम जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नंतर, कोरोनाची तीव्रता पाहता, टास्क फोर्सने लिहून दिलेली औषधे घेतली पाहिजेत. त्यांनी पुढे सांगितले की, ज्या दिवशी आपल्या तोंडाची चव निघून जाईल आणि भूक कमी होऊ लागेल त्या दिवसापासून 40% पेक्षा जास्त अल्कोहोल असलेल्या गोष्टी- कोणतीही दारू, देशी दारू किंवा व्होडका, ब्रँडी, व्हिस्की याचे सेवन केले पाहिजे. 30 मिलीलीटर अल्कोहोल आणि 30 मिली पाणी मिसळून रुग्णाला द्यावे. (हेही वाचा: कल्याण-डोंबिवली येथे Mucormycosis आजारावर उपचार घेणाऱ्या 2 रुग्णांचा मृत्यू ; महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी पाटील यांची माहिती)
अरुण यांनी कोरोना रूग्णांनी मद्यपान करण्यामागील काही कारणेही दिली आहेत. ते म्हणाले की, कोरोना विषाणूचे वरचे आवरण हे लिपिडचे आहे, जे अल्कोहोलच्या संपर्कात नष्ट होतो. म्हणूनच सॅनिटायझरने आपले हात धुण्याचा सल्ला दिला जातो. मद्यपान केल्यावर, 30 सेकंदात ते रक्त नलीकांद्वारे संपूर्ण शरीरात पोहोचते. फुफ्फुसानंतर अल्कोहोल हवेच्या संपर्कात येते आणि वायुमार्गाने बाहेर पडते. या प्रक्रियेदरम्यान, शरीरात उपस्थित कोरोना विषाणू निष्क्रिय होतो. तसेच कोरोना काळात रूग्णांवर मोठा मानसिक ताण असतो, अल्कोहोल हा ताण कमी करण्यासाठी मदत करते.
डॉक्टर म्हणतात की, त्यांनी आतापर्यंत 40 ते 50 रूग्णांना मद्यपान करण्याचा सल्ला दिला आहे. ते रुग्णांना औषधांसह मर्यादित प्रमाणात मद्यपान करण्यास सांगतात. आतापर्यंत या तंत्राने 40 ते 50 रुग्ण बरे झाले आहेत, त्यापैकी 10 रुग्ण गंभीर आजारी होते व आतापर्यंत एकही रुग्ण मरण पावला नाही असे भिसे यांनी सांगितले.