प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना म्युकरमायकोसीस (Mucormycosis) या संकटाने यात आणखी भर घातली आहे. कोरोनापाठोपाठ आता काहीजण म्युकरमायकोसीच्या जाळ्यात अडकत चालले आहेत. यातच म्युकरमायकोसीसने कल्याण-डोंबिवली (Kalyan- Dombivli) येथील दोन नागरिकांचा बळी घेतला आहे. तर, 6 जणांवर रुग्णालयात उपचार सरु असल्याची माहिती महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील (Dr. Ashwini Patil) यांनी दिली आहे. यामुळे कल्याण- डोंबिवलीसह संपूर्ण महाराष्ट्रात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठाणे ग्रामीणमधले म्हारळ भागातील तरूण तुकाराम भोईर (वय, 38) आणि डोंबिवली पूर्वेकडील बाजीराव काटकर (वय, 69) या नागरिकांचा म्युकरमायकोसीस आजाराने मृत्यू झाला आहे. यासंदर्भात कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने माहिती दिली आहे. डोंबिवलीतील एम्स या खाजगी रुग्णालयात या रुग्णांवर उपचार सुरु होते. सध्या आणखी 6 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. महत्वाचे म्हणजे, कोरोना रुग्णांवर उपचारासाठी गरजेपेक्षा जास्त वापरली जाणारी औषधे, मधुमेह ग्रस्त रुग्णाच्या शरीरात उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधामुळे वाढणारे साखरेचे प्रमाण यामुळे अशा रुग्णांना म्युकरमायकोसीस आजार होण्याचे प्रमाण जास्त आहे. हे देखील वाचा- Covid-19 Vaccination Campaign: लसीकरण मोहिमेवरून राजकारण तापलं; CoWIN पोर्टलऐवजी राज्य सरकारला बनवायचे आहे स्वतःचे अ‍ॅप

म्युकोरमायकोसिस आजाराबाबत महाराष्ट्र सरकार गंभीर आहे. या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढू नये म्हणून राज्य सरकारने आतापासूनच पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. या आजाराचा संभाव्य धोका विचारात घेऊन राज्य सरकार उपाययोजना करत आहे. या उपाययोजनांचा भाग म्हणून राज्य सरकारने म्युकोरमायकोसिस आजाराच्या उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शन्सची सुमारे 1 लाख नग इतक्या प्रमाणात ऑर्डर दिली आहे. ही ऑर्डर मुंबई येथील हाफकिन इन्स्टिट्यूटला देण्यात आल्याचे वृत्त आहे.